पाच तास झटून रुक्मिणीमातेची पावले केली पूर्ववत | पुढारी

पाच तास झटून रुक्मिणीमातेची पावले केली पूर्ववत

पुणे : आशिष देशमुख ‘आम्ही रात्री बारा वाजता रुक्मिणी मातेच्या गाभार्‍यात प्रवेश केला. या ठिकाणचे वातावरण एका सकारात्मक ऊर्जेने भारलेले असल्याने थकवा आलाच नाही. मातेच्या पावलांची खूप झीज झाली होती. रात्रीच्या नीरव शांततेत आम्ही कामाला लागलो ते पहाटेचे पाच कधी वाजले, ते कळलेच नाही. पावले जेव्हा पूर्ववत झाली तेव्हा आम्हा सर्वांना रखुमाईची मनोभावे सेवा केल्याचे भाग्य लाभले. हा आनंद शब्दांत वर्णन करणे कठीण आहे…’हे शब्द आहेत केंद्रीय पुरातत्व विभागाच्या विज्ञान विभागाच्या पथकाचे प्रमुख श्रीकांत मिश्रा यांचे.

केंद्राच्या या टीमचे प्रमुख कार्यालय औरंगाबाद येथे आहे. त्यावर देशातील 13 राज्यांचा कार्यभार आहे. तसेच वेळप्रसंगी त्यांच्या टीमला विदेशातील मूर्तिसंवर्धनासाठी जावे लागते. या टीमने 2015-16 मध्ये पांडुरंगाच्या मंदिरावर संवर्धनाचे काम केले आहे. त्यानंतर याच टीमने प्रथम 2020 मध्ये कोरोना काळात विठ्ठलमूर्तीवर वज्र-लेप करण्याचे काम केले. यंदा मे 2022 मध्ये रुक्मिणी मातेच्या चरणांवर संवर्धन प्रक्रिया करण्याचे काम केले आहे. वज्र-लेपानिमित्त वारंवार पंढरपुरात जाणारे हे रसायनशास्त्रज्ञही पंढरपुरात गेल्यावर मूर्तीसमोर गेले की भान हरपून जाऊन भावविभोर होतात, अशी कबुलीच त्यांनी दै. ‘पुढारी’शी बोलताना दिली.

विठ्ठल आणि रुक्मिणी या दोन्ही मूर्ती वेगवेगळ्या पाषाणात तयार केल्या आहेत. विठ्ठलमूर्तीचा दगड खडबडीत, तर रुक्मिणी मातेच्या मूर्तीचा दगड मऊ आहे. दोन्ही मूर्तींच्या पायांची खूपच झीज झाली होती.

हेही वाचा

Back to top button