पुणे : ब्रॉयलर कोंबडीच्या दरात मोठी घसरण | पुढारी

पुणे : ब्रॉयलर कोंबडीच्या दरात मोठी घसरण

मंचर : संतोष वळसे पाटील : आषाढ महिना सुरू झाला असून, ब्रॉयलर कोंबडीच्या लिफ्टिंग दरामध्ये मोठ्या प्रमाणावर घसरण झाल्याने खवय्यांना सुगीचे दिवस आले आहेत. आषाढ महिन्यात चांगला बाजारभाव मिळतो, असे गृहीत धरून अनेक पोल्ट्री व्यावसायिकांनी ब्रॉयलर कोंबड्यांचे संगोपन केले. त्यामुळे बाजारात ब्रॉयलर कोंबड्यांची आवक वाढली असली, तरी ग्राहकाकडून मागणी नसल्याने बाजारभाव गडगडले आहेत.

दरम्यान, अंड्यांच्या बाजारभावात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून, अंड्यांचे दर शेकडा 600 रुपयांपर्यंत गेले आहेत. घाऊक बाजारात किरकोळ 7 रुपये दराने अंडी विक्री होत आहे. बहुतांश अंड्यांचे पोल्ट्री शेड बंद पडल्यामुळे तसेच अंड्यांची बाजारात उपलब्धता होत नसल्याने अंड्यांचे दर वाढले आहेत, अशी माहिती वैदवाडी जारकरवाडी येथील अंडी उत्पादक शेतकरी सागर तापकीर आणि कांताराम टाव्हरे यांनी दिली.

आषाढ महिना सुरू झाला असून, गावठी कोंबड्या आणि कोंबड्यांना मोठ्या प्रमाणावर मागणी वाढली आहे. त्यांच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाली आहे. आषाढ महिन्यात गावठी कोंबडा 600 ते 700 रुपयांना आणि गावठी कोंबडी 450 ते 500 रुपये दराने विकली जात आहे, अशी माहिती चिकन विक्रेत्यांनी दिली. बोकडाच्या आणि मेंढराच्या मटणाला मागणी वाढली असून, मटणाचे दर 600 ते 640 रुपयांदरम्यान असल्याची माहिती एकलहरे येथील बकर्‍याचे व्यापारी व विक्रेते मटण शेखर कांबळे यांनी दिली.

गेल्या महिनाभरापासून ग्रामीण भागात 220 रुपये किलो दराने मिळणारे चिकन सध्याच्या परिस्थितीत 200 रुपये किलोपर्यंत आले आहे. चिकनचे दर अजूनही खाली जाण्याची शक्यता घाऊक बाजारामध्ये वर्तविण्यात येत आहे. बाजारात मोठ्या प्रमाणात ब्रॉयलर कोंबड्यांच्या मालाची आवक झाली असून, ऐन आषाढ महिन्यात चिकन खवय्यांना स्वस्त दरात चिकन मिळणार आहे.

– इसाक शेख, ख्वाजा गरीब नवाज चिकन सेंटर, कळंब

Back to top button