पिंपरी : …तरी जलपर्णी काढण्याचे काम सुरू | पुढारी

पिंपरी : ...तरी जलपर्णी काढण्याचे काम सुरू

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पिंपरी चिंचवड शहरात रावेत याठिकाणी जलपर्णी काढण्याचे काम सुरु आहे. दरवर्षी जलपर्णी काढण्यास केलेला उशीर यामुळे नागरिक संताप व्यक्त करत आहेत. शहरात पावसाळापूर्व नाले सफाई आणि जलपर्णी काढावी, अशी मागणी दरवर्षी नागरिक आणि सामाजिक संस्था करत असतात.

मात्र, शहरामध्ये अद्यापही नाल्यामध्ये कचरा आणि नदीपात्रात जलपर्णी साचलेली आहे. महापालिकेकडून मोठ्या पावसाने जलपर्णी वाहून जाण्याची आणि खर्च वाचविण्याची वाट पाहिली जाते. म्हणून ही कामे पावसाळा आला तरी संथ गतीने होत आहेत, असा आरोप नागरिक करत आहेत.

नदीपात्रात साचलेल्या जलपर्णीमुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. पावसाळा आला की ही समस्या अधिकच तीव्र बनते. जलपर्णीमुळे डास आणि दुर्गंधी यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. रावेत येथील नदीपात्रात जेसीबीच्या सहाय्याने जलपर्णी काढण्याचे काम सुरू आहे. आता पावसाला सुरुवात झाली आहे. एव्हाना जलपर्णी काढण्याचे काम पूर्ण व्हायला हवे होते. संथगतीने जलपर्णी काढण्याच्या कामाला वेग द्यावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Back to top button