पुणे : डॉक्टर महिलेला दोन लाखांचा गंडा | पुढारी

पुणे : डॉक्टर महिलेला दोन लाखांचा गंडा

पुणे : पुढारी वृत्तसेवा : क्रेडिट कार्डवर इन्शुरन्स आणि सर्व्हिस चार्जेस लागल्याची बतावणी करून सायबर चोरट्यांनी नेत्रचिकित्सक डॉक्टर महिलेला 1 लाख 97 हजार 827 रुपयांचा आर्थिक गंडा घातला. याप्रकरणी हडपसरमधील 37 वर्षीय डॉक्टर महिलेने वानवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यानुसार अज्ञात सायबर चोरट्यांविरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी महिला एका हॉस्पिटलमध्ये नेत्रचिकित्सक आहेत. त्यांना 7 एप्रिल रोजी मोबाईलवर फोन आला. त्याने तुमच्या क्रेडिट कार्डवर इन्शुरन्स व इतर सर्व्हिस चार्ज लागले आहेत, हे तुम्हाला माहिती आहे का असे विचारले.

मिरज : हुसेन याच्या कार्यालय, घरावर पोलिसांचा छापा

त्यांनी क्रेडिट कार्ड बंद करायचे असल्याचे सांगितले, तेव्हा त्याने तुमच्या कार्डच्या मागे असलेल्या कस्टमर केअर नंबरवरून तुम्हाला फोन येईल. त्यांना सांगून तुम्ही कार्ड बंद करू शकता, असे सांगितले. त्यानंतर काही वेळाने 1800 नंबरने सुरू होणार्‍या नंबरवरून त्यांना एक फोन आला. त्याने त्यांची माहिती विचारून घेतली. तुम्हाला कार्ड बंद करायचे असेल तर मागील तीन आकडी नंबर जाणून घेतला. त्यानंतर तुम्ही जो पत्ता दिला आहे, त्याच पत्त्यावर राहता का ?

बँकेने पत्त्याचे व्हेरिफिकेशन केले का ? बँकेचा माणूस तुमच्या घरी येईल, असे सांगत त्यांना बोलण्यात गुंतविले. त्यातच त्यांना त्याने तुम्हाला ओटीपी आला असेल, तो सांगा, असे म्हणाला. बोलण्याच्या नादात त्यांनी त्याला ओटीपी सांगितला. त्यानंतर काही मिनिटांत त्यांच्या खात्यातून सायबर चोरट्यांनी 1 लाख 97 हजार 827 रुपये काढून घेऊन खाते रिकामे केले. त्यांनी तातडीने याची तक्रार सायबर पोलिसांकडे केली. सायबर पोलिसांनी पुढील पावले उचलून ही रक्कम ज्या बँकेत गेली, त्यांच्याशी पत्रव्यवहार करून ही रक्कम गोठविली आहे. पोलिस निरीक्षक शिवले तपास करीत आहेत.

गोपनीय माहिती कुणाला देऊ नका
बँक खात्याचा गोपनीय क्रमांक कोणाला सांगू नका, अनोळखी व्यक्तीला फोनद्वारे माहिती देणे टाळा, याबाबत बँका, पोलिस वारंवार जनजागृती करीत असतात. आपल्या मोबाईलवर त्यासंबंधित मेसेज बँकांकडून नियमितपणे पाठविले जातात. असे असतानाही सायबर चोरट्यांच्या जाळ्यात सुशिक्षितच सर्वाधिक अडकत असल्याचे दिसून आले आहे.

Back to top button