हुल्लडबाजीला आवर घालण्यासाठी आता सिंहगडावर जागता पहारा | पुढारी

हुल्लडबाजीला आवर घालण्यासाठी आता सिंहगडावर जागता पहारा

वेल्हे : पुढारी वृत्तसेवा : मनाई असतानाही सिंहगड किल्ल्यावर मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत तरुणाई जल्लोष करते. तो रोखण्यासाठी वनखात्याने गडावर जाणार्‍या घाटरस्ता पायथ्याच्या डोणजे-गोळेवाडी नाक्यावर जागता पहारा सुरू केला आहे. याशिवाय घाट रस्त्याच्या कोंढणपूर-अवसरवाडी नाक्यावरही 24 तास जागता पहारा तैनात करण्यात येणार आहे.

सिंहगडसारख्या अत्यंत ऐतिहासिक महत्त्व असलेल्या संरक्षित स्थळांच्या पावित्र्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. घाट रस्त्यावरील दोन्ही बाजूच्या नाक्यावर रात्री दहा वाजेनंतर सुरक्षारक्षक, पहारेकरी नसल्याने गडावर रात्रभर तरुणाईचा जल्लोष सुरू आहे.
याबाबत दै. ‘पुढारी’त वृत्त प्रसिद्ध होताच वनविभागाने तातडीने दखल घेत गोळेवाडी नाक्यावर सायंकाळी सहा वाजेपासून दुसर्‍या दिवशी सकाळी सहा वाजेपर्यंत दोन सुरक्षारक्षकांचा जागता पहारा सुरू केला आहे.

पर्यटकांना सिंहगडावर जाण्यास रात्री मनाई आहे. रात्री गडावर जाणार्‍या पर्यटकांना रोखण्यासाठी गडाच्या गोळेवाडी तपासणी नाक्यावर रात्रभर दोन सुरक्षारक्षक तैनात केले आहेत. अवसरवाडी नाक्यावरही गेट बसवून सुरक्षारक्षक तैनात करण्यात येणार आहेत. रात्री-अपरात्री काही उन्मत्त पर्यटक जात असल्याने त्यांना प्रतिबंध करण्यासाठी वनविभागाने आवश्यक ती खबरदारी घेतली आहे.

.- बाबासाहेब लटके, वनपरिमंडल अधिकारी, सिंहगड वनविभाग

Back to top button