समुद्रमार्गे केशर आंब्यांची अमेरिकेला यशस्वी निर्यात | पुढारी

समुद्रमार्गे केशर आंब्यांची अमेरिकेला यशस्वी निर्यात

पुणे : पुढारी वृत्तसेवा: मुंबईतून अमेरिकेत केशर आंब्यांची समुद्रमार्गे यशस्वी निर्यात झाली आहे. 5 जून रोजी मुंबईहून विविध निर्यातीसाठीच्या आवश्यक प्रक्रिया करून पाठविलेला आंबा अमेरिकेच्या बाजारपेठेत 29 जूनला म्हणजे 25 दिवसांनी सुस्थितीत पोहोचला. त्यामुळे अधिक विमान भाडे देण्याऐवजी आता स्वस्त जलवाहतुकीद्वारे आंबा निर्यातीच्या नव्या पर्यायांमुळे देशातून अमेरिकेसह अन्य देशांना आंबा निर्यातीचा नवा पर्याय खुला झाला आहे. अमेरिकेस समुद्रमार्गे आंबा निर्यातीसाठी भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटरचे (बीएआरसी) डॉ. गौतम, कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक व राज्याचे पणन संचालक सुनील पवार, तसेच अमेरिकेच्या निरीक्षक डॉ. कॅथरीन फिडलर यांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले आहे.

मुंबईतून एकूण 5 हजार 520 बॉक्सेसमधून 16 हजार 560 किलो केशर आंब्यांवर निर्यातीसाठी आवश्यक असलेल्या योग्य त्या प्रक्रिया केल्यानंतरच कंटेनरद्वारे 3 जून रोजी जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट न्हावाशेवा बंदराकडे रवाना करण्यात आला. तेथून 5 जून रोजी आंब्यांचा कंटेनर अमेरिकेकडे रवाना झाला होता. हा कंटेनर अमेरिकेत नेवार्क या न्यूजर्सी शहराजवळील बंदरात 29 जून 2022 रोजी पोहोचला. आंबा निर्यातदार असलेल्या खासगी कंपनीने पाठविलेला आंबा तेथील आयातदार कंपनीच्या प्रतिनिधींनी ताब्यात घेतला. कंटनेरमधील आंबा सुस्थितीत पोहोचल्याने समाधान व्यक्त होत आहे.

या कामी बीएआरसीचे अधिकारी, केंद्र सरकारचे अधिकारी, पणन मंडळाचे उपसरव्यवस्थापक डॉ. भास्कर पाटील, अभिमन्यू माने, सुशील चव्हाण आणि खासगी आंबा निर्यातदारांनी विशेष परिश्रम घेतले.
दरम्यान, भारतातून चालूवर्षी 2022 मध्ये अमेरिकेला अकराशे टन आंब्यांची शंभर टक्के हवाई वाहतुकीद्वारेच निर्यात झाली. त्यासाठी प्रतिकिलोस 550 रुपये विमानभाडे द्यावे लागले आहे. त्या पार्श्वभूमीवर स्वस्त जलवाहतुकीने नवी संधी अधिक आंबा निर्यातीस मिळणार असल्याचे पणन मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले.

मुंबईहून विमान वाहतुकीचे भाडे हे आंब्यांच्या तीन किलोच्या बॉक्सला 1,750 रुपये येते. जलवाहतुकीद्वारे तीन किलोच्या बॉक्सला हेच भाडे आता 250 रुपयांपर्यंत खाली येणार आहे. वाहतूक खर्चातील बचतीमुळे अमेरिकेच्या बाजारपेठेत भारतीय आंबा किमतीच्या दृष्टीने स्पर्धात्मक ठरून अन्य देशांच्या आंब्यांशी स्पर्धा करू शकतो. उत्तम दर्जा आणि वाजवी दरामुळे आंबा विक्री अधिक होऊन निर्यातीला चालना मिळेल, अशी अपेक्षा आहे. तसेच अमेरिकेबरोबरच इतर देशांनाही समुद्रमार्गे आंबा निर्यात शक्य होणार आहे.

                          – सुनील पवार, कार्यकारी संचालक, राज्य कृषी पणन मंडळ,पुणे

Back to top button