मद्यपीने वाहतूक नियमन करणार्‍यांवर घातला टेम्पो; महाळुंगे येथील घटना | पुढारी

मद्यपीने वाहतूक नियमन करणार्‍यांवर घातला टेम्पो; महाळुंगे येथील घटना

चाकण : पुढारी वृत्तसेवा; मद्यपी चालकाने वेगाने टेम्पो चालवून वाहतूक नियमन करीत असलेल्या तीन पोलिसांच्या अंगावर घातला. त्यात सहायक पोलीस निरीक्षक, हवालदार आणि वॉर्डन हे जखमी झाले आहेत. मद्यपी चालकाला पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना शुक्रवारी (दि. 1 जुलै) चाकण एमआयडीसीमध्ये इंडोरन्स चौक, महाळुंगे (ता. खेड) येथे घडली. सहायक पोलीस निरीक्षक मच्छिन्द्र आदलिंग, पोलीस हवालदार प्रकाश कोंढावळे, वॉर्डन दिलीप राठोड अशी जखमींची नावे आहेत. याप्रकरणी प्रकाश कोंढावळे यांनी महाळुंगे पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार चालक किरण अर्जुन पाटील (वय 19, रा. रोही लगड, जालना) याला अटक केली.

तर, वाहनमालक नामदेव भानुदास बोडके (वय 32, रा. वाळुंज एमआयडीसी, ता. जि. औरंगाबाद) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाहतूक विभागाने महाळुंगे येथील इंडोरन्स चौकात शुक्रवारी नाकाबंदी लावली होती. दुपारी चौकात सहायक पोलीस निरीक्षक आदलिंग आणि कर्मचारी नेमणुकीस होते. पोलीस वाहतूक नियमांचे काम करीत असताना, आरोपी किरण पाटील हा छोटा हत्ती टेम्पो (एम एच 20 / ई जी 8760) भरधाव चालवत आला.

त्याने मद्य प्राशन केलेले होते. किरण याने टेम्पो थेट पोलिसांच्या अंगावर चढवला. यात सहायक निरीक्षक आदलिंग यांच्या गुडघ्याला गंभीर दुखापत झाली आहे. हवालदार कोंढावळे यांच्याही पायाला इजा झाली असून, वॉर्डन राठोड या घटनेत जखमी झाले. अपघात झाल्यानंतर किरण हा टेम्पो घेऊन पळून गेला. आरोपी टेम्पोमालक नामदेव याने किरणकडे वाहन चालवण्याचा परवाना नसतानादेखील त्याला वाहन चालवायला दिले, असे फिर्यादित म्हटले आहे. पोलीस उपनिरीक्षक किरण शिंदे अधिक तपास करीत आहेत.

Back to top button