पिंपरी : गर्भनिरोधक गोळ्या, स्टेरॉईड्सची ऑनलाइन विक्री | पुढारी

पिंपरी : गर्भनिरोधक गोळ्या, स्टेरॉईड्सची ऑनलाइन विक्री

दीपेश सुराणा 

पिंपरी : गर्भनिरोधक गोळ्या, स्टेरॉईड्स यांच्या ऑनलाइन विक्रीला प्रतिबंध असतानाही त्यांची सर्रास विक्री सुरू असल्याचे चित्र आहे. अन्न व औषध प्रशासनाकडून याबाबत ठोस कारवाई होत नसल्याने ऑनलाइन औषध विक्रेत्यांचे चांगलेच फावते आहे.

केंद्र सरकारकडून ई-फार्मसी संदर्भातील नियम निश्चित करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. अद्याप त्याबाबत कायदा झालेला नाही; मात्र, हे नियम निश्चित होईपर्यंत औषधांची बेकायदा किंवा परवानगीशिवाय विक्री करण्यास बंदी घालण्यात यावी, असे आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने दिले आहेत; मात्र ही बंदी झुगारून सर्रास ऑनलाइन औषध विक्री सुरु आहे. झोपेच्या गोळ्या देखील यापूर्वी ऑनलाइन विकल्या जात होत्या. मात्र, विविध ऑनलाइन वेबसाईटवर ‘सर्च’ केल्यानंतर या गोळ्यांसमोर ‘नॉट फॉर सेल’ म्हणून लिहिले असल्याचे पाहण्यास मिळते.

ऑनलाइन औषध विक्रीमध्ये खूप धोके आहेत. या माध्यमातून झोपेच्या गोळ्या, गर्भनिरोधक औषधे मागविली जाऊ शकतात. तसेच, त्यासाठी ‘अपलोड’ केले जाणारे डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शनही बनावट असू शकते. त्यामुळे ऑनलाइन औषध विक्रीवर प्रतिबंध घालण्यात यावा.
– संतोष खिंवसरा, अध्यक्ष,
पिंपरी-चिंचवड केमिस्ट असोसिएशन.

ऑनलाइन औषध विक्रीची पद्धत
इंटरनेटवर ‘ऑनलाइन मेडीसीन’ असे सर्च केल्यानंतर सहजतेने ऑनलाइन औषध विक्री करणार्‍या अनेक संकेतस्थळे सापडतात. या संकेतस्थळावर आपणांस हवी त्या औषधांची मागणी नोंदविता येते. त्यासाठी डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन ‘अपलोड’ करावे लागते; परंतु आपल्याकडे डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन नसल्यास दूरध्वनीद्वारे डॉक्टरांचा मोफत सल्ला दिला जातो. त्यानंतर ऑनलाइन औषधे पाठविली जातात. ऑनलाइन औषधांवर 20 ते 25 टक्के सवलत दिली जाते. तर, लॅब तपासणी आणि आरोग्य तपासणीसाठी 35 टक्के सवलत असल्याचे पाहण्यास मिळते.

दोन वर्षांत 5 जणांवर गुन्हे
अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वतीने गेल्या दोन वर्षात डॉक्टर प्रिस्क्रिप्शनशिवाय ऑनलाइन औषध विक्री प्रकरणी 5 जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे. त्यात पिंपरी-चिंचवड परिसरात 3 गुन्हे दाखल केले. झोपेच्या गोळ्या, गर्भनिरोधक औषधे, स्टेराईडस यांच्या ऑनलाइन विक्रीला प्रतिबंध आहे. त्यामुळे ही औषधे ऑनलाइन उपलब्ध करून देणार्‍या वेबसाईटवर डमी ऑर्डर टाकून त्यामध्ये कोणी औषधे पाठविल्यास त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात येते, अशी माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाचे (औषधे) सहाय्यक आयुक्त श्याम प्रतापवार यांनी दिली.

Back to top button