सत्ताबदलाने घोडगंगा कारखान्याची निवडणूक होणार रंगतदार | पुढारी

सत्ताबदलाने घोडगंगा कारखान्याची निवडणूक होणार रंगतदार

मांडवगण फराटा ; पुढारी वृत्तसेवा: राज्यातील सत्ताबदलामुळे शिरूर तालुक्याच्या पूर्व भागात भाजप पदाधिकार्‍यांमध्ये पुन्हा उत्साह संचारला असून रावसाहेबदादा पवार घोडगंगा कारखान्याची निवडणूक रंगतदार होण्याचे चित्र दिसून येत आहेत. शिरूर तालुक्यातील महत्त्वाची सहकारी संस्था म्हणून ’घोडगंगा’ ओळखला जातो. या कारखान्याची निवडणूक प्रक्रिया सध्या सुरू आहे. कारखाना अडचणीत असताना गेली दोन वर्षे सातत्याने टीकेची झोड आमदार व कारखान्याचे अध्यक्ष अशोक पवार यांच्यावर विरोधकांकडून उठवली जात आहे. राज्यात पुन्हा सत्ता बदल झाला असून त्याचे पडसाद उमटत आहेत.

शिरूर तालुक्यात पूर्व भागात भाजपचे अनेक निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. राष्ट्रवादीचे आमदार पवार यांच्यावर नाराजीचा असलेला सूर, साखर कारखाना अडचणीत असतानाही घेतलेले निर्णय, कामगारांचे थकीत पगार असे अनेक महत्त्वाचे मुद्दे यावर विरोधक आमदार पवार यांना लक्ष्य करत होते, त्यामुळे राज्यातील सत्ताबदलाचा परिणाम या निवडणुकीवर होणार असल्याचे बोलले जात आहे. याविषयी बोलताना भाजपचे माजी तालुकाध्यक्ष दादा पाटील फराटे यांनी सांगितले की, केंद्रीय सहकार मंत्री व गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्यावर सत्ता आली तर कारखाना निश्चित अडचणीतून बाहेर पडेल असा विश्वास फराटे यांनी दिला.

Back to top button