पुणे : सरदार पटेल रुग्णालयात मॉडेल शस्त्रक्रियागृह | पुढारी

पुणे : सरदार पटेल रुग्णालयात मॉडेल शस्त्रक्रियागृह

पुणे :  कॅन्टोमेंट बोर्डाच्या सरदार वल्लभभाई पटेल रुग्णालयातील शस्त्रक्रियागृह दोन वर्षापूर्वी जळून खाक झाले होते.तेव्हांपासून शस्त्रक्रिया बंद होत्या. आता सामाजिक दायित्व (सीएसआर) निधीतून मॉडेल शस्त्रक्रिया उभारण्यात आले असून, त्याचे लोकार्पण शुक्रवारी करण्यात आले. त्यामुळे आता शस्त्रक्रियांसाठी रुग्णांना इतर रुग्णालयात जाण्याची गरज भासणार नाही.

शस्त्रक्रियागृहाचे लोकार्पण दक्षिण कमांडचे महानिरीक्षक केजीएस चव्हाण, कमांड हॉस्पिटलचे उपप्रमुख ब्रिगेडर डॉ.भुपेश गोयल, सायबेज आशा चॅरिटेबल ट्रस्टच्या नितू नथानी, साबळे-वाघीरे ग्रुपचे ग्रुपचे सुधीर साबळे, पल्लवी साबळे, मुख्यकार्यकारी अधिकारी सुब्रत पाल, स्वीकृत सदस्य सचिन मथुरावाला उपस्थित होते.

कॅन्टोमेंट बोर्डाच्या हद्दीतील रुग्णांसाठी सरदार वल्लभभाई पटेल रुग्णालय असून, सप्टेंबर 2020 मध्ये शस्त्रक्रियागृहाला आग लागून जळून खाक झाले होते. त्यामुळे याठिकाणी शस्त्रक्रिया बंद होत्या. परिणामी रुग्णांना शस्त्रक्रियांसाठी खासगी किंवा इतर शासकीय रुग्णालयात जावे लागत होते. ही बाब लक्षात घेऊन सायबेज आशा चॅरिटेबल ट्रस्टच्या नितू नथानी यांनी सीएसआरअंतर्गत तब्बल एक कोटी 62 लाख रुपये खर्च करुन रुग्णालयात मॉडेल शस्त्रक्रियागृह उभारले आहे. त्यामध्ये एकूण चार शस्त्रक्रियागृह असून, त्यामध्ये दोन मोठ्या आणि दोन ठिकाणी छोट्या शस्त्रक्रियागृहांचा समावेश आहे.

जुने शस्त्रक्रियागृह असताना मोठ्या 500 आणि छोट्या सुमारे एक हजार शस्त्रक्रिया केल्या जात होत्या. परंतु आता मॉडेल शस्त्रक्रियागृहामुळे दोन्ही शस्त्रक्रिया दुप्पट होतील. सरदार पटेल रुग्णालयात महात्मा फुले जन आरोग्य योजना लागू करण्यात आली असून, पात्र रुग्णांवर उपचार केले जात आहेत अशी माहिती डॉ.महेश दळवी यांनी दिली. रुग्णालयाच्या निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. उषा तपासे, डॉ. उदय बुजबळ यांच्यासह रुग्णालयातील डॉक्टर्स आणि इतर कर्मचारी उपस्थित होते.

Back to top button