रेल्वे ‘टीसीं’च्या हाती आता टॅब; रेल्वेच्या दोन गाड्यांमध्ये आज प्रायोगिक चाचणी | पुढारी

रेल्वे ‘टीसीं’च्या हाती आता टॅब; रेल्वेच्या दोन गाड्यांमध्ये आज प्रायोगिक चाचणी

पुणे: पुढारी वृत्तसेवा: सध्याच्या घडीला शासनाच्या सर्वच स्तरांवरील कामकाज ऑनलाइनरीत्या होत आहे. मात्र, रेल्वेच्या टीसींचे काम पारंपरिक पद्धतीनेच सुरू होते. त्यामध्ये आता बदल करण्यात आला असून, रेल्वेचे टीसीदेखील हातात टॅब घेऊन काम करताना पाहायला मिळतील. रेल्वे प्रशासनाच्या वतीने टीसींचे (तिकीट चेकर) काम ऑनलाइन होण्यासाठी सर्व विभागांना टॅबचे वाटप करण्यात आले आहे. यात रेल्वेच्या पुणे विभागाला 96 टॅब मिळाले आहेत. मध्य रेल्वेकडून या टॅबद्वारे 13 गाड्यांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर कामाची चाचणी करण्यात येणार आहे. यातील पुणे विभागातील दोन गाड्यांमध्ये गुरुवारपासून (दि. 30) चाचणी होईल. ऑनलाइन कामकाज चालणार असल्यामुळे टीसींच्या हातातील कागदाचे ओझे कमी होईल.

  • या दोन गाड्यांमध्ये होणार चाचणी
  • इंद्रायणी एक्स्प्रेस
  • दुरांतो एक्स्प्रेस
  • पुणे विभागातील एकूण टीसी – 265
  • रेल्वेची ही कामे होणार सोपी
  • तिकीट तपासणी
  • रिझर्वेशन चार्टमध्ये सातत्याने होणारे बदल
  • वेटिंगवरील तिकीट दुसर्‍याला देता येणार
  • टॅब रेल्वेच्या सिस्टिमशी कनेक्ट असणार
  • अहवालदेखील ऑनलाइनच जाणार

टीसींचे कामकाज टॅबद्वारेच 

कागदविरहित कामकाज होण्यासाठी आणि पारंपरिक पध्दतीने सुरू असलेले कामकाज बदलत्या काळाप्रमाणे ऑनलाइन करण्यासाठी रेल्वेकडून टॅब वाटप करण्यात आले आहेत. सध्या दोन गाड्यांमध्ये चाचणी होणार असून, आगामी काळात सर्व टीसींचे कामकाज टॅबद्वारेच चालेल, असे रेल्वेच्या अधिकार्‍यांनी सांगितले.

Back to top button