राज्यातील भूजल पातळी खालावलेलीच, सर्वेक्षणचा निष्कर्ष

राज्यातील भूजल पातळी खालावलेलीच, सर्वेक्षणचा निष्कर्ष
Published on
Updated on

शिवाजी शिंदे

पुणे : राज्यातील सुमारे 114 गावांतील भूजलपातळी खालावली असल्याचा निष्कर्ष नुकताच भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा विभागाने काढला आहे. त्यानुसार भूजल पातळीमध्ये 2 ते 3 मीटर घट असलेल्या 2 तालुक्यांतील 5 गावांचा आणि 1 ते 2 मीटर घट असलेल्या 9 तालुक्यांतील 109 गावांचा समावेश आहे. यंदा अद्याप दमदार पावसाला सुरुवात झाली नसल्याने भूजलाची पातळी आणखी खालाविण्याची शक्यता आहे, असा निष्कर्ष भूजल सर्वेक्षण विभागाने म्हटले आहे. गेल्या पावसाळ्यात मुख्यत्वे पुणे, सातारा, नंदुरबार या तीन जिल्ह्यांतील शंभरपेक्षा अधिक गावांमध्ये भूजलपातळी पूर्वीच्या तुलनेत एक ते दोन मीटर इतकी घटल्याचे भूजल विभागाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे उन्हाळ्यात या गावात टँकरने पाणी पुरवावे लागले होते. याशिवाय अजूनही या गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा सुरूच आहे.

राज्यातील एकूण निरीक्षण विहिरींपैकी 2 हजार 978 विहिरींमधील भूजल पातळीमध्ये वाढ, तर 720 निरीक्षण विहिरींमधील भूजल पातळी सरासरीच्या तुलनेत घट झालेली आढळून आली आहे. यापैकी 98 निरीक्षण विहिरींमधील भूजल पातळीमध्ये तीन मीटरपेक्षा जास्त घट, 33 निरीक्षण विहिरींतील भूजल पातळीमध्ये 2 ते 3 मीटर एवढी घट, तर 119 निरीक्षण विहिरींतील भूजल पातळीमध्ये 1 ते 2 मीटर एवढी घट असून, 550 निरीक्षण विहिरींतील भूजल पातळीमध्ये एक मीटर एवढी घट झाली असल्याचे निष्कर्षावरून दिसून आले.

मे महिन्याच्या अखेरीस निरीक्षण विहिरींतील स्थिर भूजल पातळीच्या तुलनात्मक अभ्यासाच्या आधारे पर्जन्यमान असलेल्या 6 जिल्ह्यांतील 9 तालुक्यांतील निरीक्षण विहिरींतील भूजल पातळीमध्ये एक मीटरपेक्षा जास्त घट आढळून आल्यामुळे या नऊ तालुक्यांतील सुमारे 114 गावांमध्ये सध्या पिण्याच्या पाण्याची टंचाई असल्याचा अनुमान भूजल सर्वेक्षण विभागाने काढला आहे. यामध्ये भूजल पातळीमध्ये 2 ते 3 मीटर घट असलेल्या 2 तालुक्यांतील 5 गावांचा आणि 1 ते 2 मीटर घट असलेल्या 9 तालुक्यांतील 109 गावांचा समावेश आहे.

भूजल पातळीमध्ये घट झालेले जिल्हे व तालुक्यांची संख्या
(पाणी पातळी 1 ते 3 मीटरने खालावलेली)

जिल्हा — तालुका — पाणी पातळी खालावलेली गावे
अमरावती—चिकलठाणा – 1
धुळे—– शिरपूर —- 2
जळगाव—-चोपडा—-5
नंदुरबार— नंदुरबार —19
पुणे— आंबेगाव, बारामती, शिरूर, वेल्हे–31
सातारा— फलटण—-56

एकूण —-114 (गावे)

राज्यातील पाच जिल्ह्यांतील नऊ तालुक्यांमधील सुमारे 114 गावांतील पाणीपातळी अजूनही खालावलेली आहे. त्यामध्ये सर्वाधिक पुणे जिल्ह्यातील तालुके, तर सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील 56 गावांचा समावेश आहे.

                                  – चिंतामणी जोशी, आयुक्त भूजल सर्वेक्षण आणि विकास

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news