पुण्यात रंगणार कानडी ‘पर्व’, तब्बल आठ तास चालणारं नाटक | पुढारी

पुण्यात रंगणार कानडी ‘पर्व’, तब्बल आठ तास चालणारं नाटक

पुणे : पुढारी वृत्तसेवा : प्रसिद्ध कन्नड लेखक डॉ. एस. एल. भैरप्पा यांनी ‘महाभारत’ या ग्रंथावर लिहिलेल्या ‘पर्व’ या कादंबरीवर आधारित महानाट्याचे सादरीकरण पुण्यात होणार आहे. तब्बल आठ तास चालणार्‍या या कानडी भाषेतील महानाट्याचे आयोजन कन्नड संघ, पुणे आणि मैसुरू येथील रंगयना संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

या महानाट्याचा प्रयोग रविवारी (दि. 3 जुलै) सकाळी साडेदहा वाजता एरंडवणे येथील कलमाडी हायस्कूलमधील शकुंतला जगन्नाथ शेट्टी सभागृहात होणार आहे. नाटक सकाळी साडेदहाला सुरू होऊन सायंकाळी साडेसहाला संपेल. मानाचा सरस्वती सन्मानप्राप्त डॉ. भैरप्पा यांनी 1979 मध्ये लिहिलेल्या ‘पर्व’ या कादंबरीत महाभारताची कथा ही एकपात्री प्रयोग या साहित्यिक तंत्राद्वारे मांडण्यात आली आहे. इतिहास आणि पौराणिक कथांचे मिश्रण या कादंबरीत पाहायला मिळते.

महाभारतातील कुंती, द्रौपदी, भीम, अर्जुन, कर्ण, विदुर अशा विविध पात्रांचा त्यात समावेश आहे. या पात्रांमधील स्वीकार्याची भूक, सूड घेण्याची इच्छा, वंचिततेची भावना, लोक आणि समुदाय यांच्यापासून दुरावल्याची भावना ही या नाटकातून मांडण्यात आली आहे.
नाटकात 35 प्रमुख पात्रांमध्ये दुर्योधन (नंदकुमार), भीम (राजेश माधव), द्रौपदी (कुमारी सौम्या), संजय (राजशेखर) आणि कुंती (अक्षता) यांचा समावेश आहे. कलाकारांची वेशभूषा प्रसाद बिडप्पा यांनी केली आहे. नाटकाचे संगीत रवी मारूर यांनी दिले असून, प्रकाश योजना महेश यांनी केली आहे.

Back to top button