पिंपरी : निर्बंध शिथिल होताच नेत्रदानाचे वाढले प्रमाण; प्रतीक्षेत असलेल्या दृष्टिहीनांची वाट मोकळी | पुढारी

पिंपरी : निर्बंध शिथिल होताच नेत्रदानाचे वाढले प्रमाण; प्रतीक्षेत असलेल्या दृष्टिहीनांची वाट मोकळी

वर्षा कांबळे

पिंपरी : कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून नेत्रदानामध्ये बंधने आल्यामुळे नेत्रदानाची संख्या खूपच कमी झाली होती. मात्र, आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असल्यामुळे नेत्रगोल प्राप्त होण्याचे व शस्त्रक्रियेचे प्रमाण हळूहळू वाढत आहे. गेल्या दोन महिन्यांमध्ये 134 नेत्रगोल प्राप्त झाले असून 79 शस्त्रक्रिया झाल्या आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालयाच्या सूत्रांनी दिली.

कोरोनामध्ये रुग्णांना लवकर उपचार मिळावेत आणि मृत्यूदर कमी व्हावा यादृष्टीने तातडीच्या शस्त्रक्रिया वगळून इतर सर्व आजारांच्या शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या होत्या. तसेच, डॉक्टर व कर्मचारी यांना कोरोनाकाळात मोठ्या प्रमाणात सेवा द्यावी लागली. सर्व खासगी व सरकारी रुग्णालयातील सर्व प्रकारचे तज्ज्ञ डॉक्टर आणि कर्मचारी हे कोरोना रुग्णांच्या सेवेत अडकले होते. त्यामुळे डोळ्यांच्या व इतर शस्त्रक्रिया होऊ शकल्या नव्हत्या. शासनाच्या आदेशानुसार कोविड तपासणीनंतरच तुम्ही नेत्रदान करण्याची परवानगी होती. मात्र, नेत्रदान हे मरणोत्तर करता येत असल्यामुळे नॉन कोविड असताना एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तरी कोविड तपासणी करण्यामध्ये खूप अडचणी आल्या होत्या. त्यामुळे बुब्बुळरोपण शस्त्रक्रिया झाल्याच नाहीत.

कोरोनाचा प्रादुर्भाव जसा कमी होईल तसे उपचार व शस्त्रक्रिया करण्यात आल्या. नेत्रगोल संकलित करण्याचे वर्ष मार्च ते एप्रिल असे धरले जाते. त्यामुळे 2022 च्या एप्रिल व मे महिन्यात 134 नेत्रगोल संकलित करण्यात आले आणि आत्तापर्यंत 79 शस्त्रक्रिया झाल्या आहेत.

शस्त्रक्रियेसाठी स्वतंत्र रुग्णालय नव्हते

कोविडकाळात नेत्रगोल संकलित करण्याचे काम संसर्गामुळे शक्य नव्हते. तसेच, शस्त्रक्रिया करण्यासाठी रुग्णालये ही कोरोना रुग्णांसाठी राखीव ठेवली होती. शस्त्रकियेसाठी स्वतंत्र रुग्णालये नव्हते. त्यामुळे गेल्यावर्षीपासून नेत्रदानाचे प्रमाण कमी झाले आहे किंवा ते इच्छ असून करता आलेले नाही.

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतरदेखील बहुतांश नेत्रपेढ्या पूर्णपणे कार्यरत झालेल्या नव्हत्या. त्यामुळे नेत्रगोल मिळण्याचे प्रमाण कमी झाले होते. नेत्रपेढ्यांचे काम हळूहळू पूर्वपदावर येत आहे. त्यामुळे आता नेत्रगोल आणि शस्त्रक्रियेचे प्रमाण वाढत आहे.
– डॉ. प्रकाश रोकडे, जिल्हा नेत्र शल्य चिकित्सक, पुणे

पाच वर्षातील आकडेवारी

वर्ष                 नेत्रदान            बुब्बुळरोपण शस्त्रक्रिया
2017-18         1391                  633
2018-19        1423                   600
2019-20         483                    778
2020-21         476                     299
2021-22         34                       79

Back to top button