पिंपरी : महापालिका देहूरोड हद्दीत एक लाख झाडे लावणार | पुढारी

पिंपरी : महापालिका देहूरोड हद्दीत एक लाख झाडे लावणार

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड महापालिका देहूरोड येथील मिलिटरी स्टेशनच्या जागेत 1 लाख झाडे लावणार आहे. त्याची दोन वर्षांकरिता देखभाल काम महाराष्ट्र राज्य वन विकास महामंडळाकडे सोपविण्यात येणार आहे. त्यासाठी 7 कोटी 68 लाख 11 हजार खर्च अपेक्षित आहे.

प्रति रोप 768 रूपये 11 पैसे या दराने पालिका खर्च करणार आहे. या प्रमाणे पालिकेने या पूर्वी शहरात अनेक ठिकाणी झाडे लावली आहे. वन विकास महामंडळाच्या वतीने सन 2015 पासून नागरी भागात हरित शहर योजना राबविण्यात येत आहे. त्या अंतर्गत 1 लाख झाडे लावण्यात येणार आहेत. या उद्यान विभागाच्या प्रस्तावाला आयुक्त राजेश पाटील यांनी गुरूवारी (दि.23) झालेल्या बैठकीत मंजुरी दिली.

सभेत सुमारे 44 कोटी 87 लाख खर्चास मान्यता देण्यात आली. पालिकेच्या ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले उद्यान, दुर्गा देवी उद्यान, भोसरी सहल केंद्र उद्यान व अंकुशराव लांडगे नाट्यगृह उद्यान, वीर सावरकर उद्यान (गणेश तलाव) उद्यान देखभाल व संरक्षणसाठी कंत्राटी पद्धतीने चालविण्यास देण्यात येणार आहेत.

त्यासाठी 4 कोटी 87 लाख खर्च आहे. भोसरी प्राधिकरण सेक्टर क्रमांक 7, 10 व मध्यवर्ती सुविधा केंद्रामधील पावसाळी पाणी व्यवस्थापन नाला सुशोभिकरण आणि नाला चॅनलायझेशन कामाच्या देखभालीसाठी 1 कोटी 22 लाख खर्च आहे. भूमकर चौक ते शहपर्यंतच्या कामास स्थळ बदल करण्याससह इतर कामांना मान्यता दिली.

‘ह’ क्षेत्रीय कार्यालय क्षेत्रातील ड्रेनेजलाइनची यांत्रिक पद्धतीने साफसफाई व चोक-अपची कामे करण्यात येणार आहेत. या कामासाठी 1 कोटी 31 लाख खर्च आहे. खासगी वाटाघाटी समितीने मंजूर विकास योजनेतील रस्ते व आरक्षणाने बाधित क्षेत्राचा मोबदला संबंधित मिळकतधारकास खासगी वाटाघाटीने देण्यासाठी मंजूरी देण्यात आली.

वायसीएमच्या सीएसएसडीसाठी साडेसतरा कोटी

वायसीएम रुग्णालयातील मध्यवर्ती निर्जंतूकीकरण केंद्र (सीएसएसडी) अद्ययावत व नुतनीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी 17 कोटी 58 लाख रुपये खर्च होणार आहे. या खर्चास प्रशासक राजेश पाटील यांनी मंजुरी दिली.

प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेला सावित्रीबाई फुलेंचे नाव

ठाणे महापालिकेच्या सी.डी. देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेच्या धर्तीवर केंद्रीय लोकसेवा आयोग व इतर संलग्न परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांसाठी गांधीनगर, पिंपरी येथील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक येथे पालिकेच्या वतीने प्रशासकीय प्रशिक्षण संस्था सुरू करण्यात येत आहे. या संस्थेस ‘सावित्रीबाई फुले अकादमी’ असे नाव दिले जाणार आहे.

सात जलतरण तलाव खासगी संस्थांना देणार
महापालिकेचे एकूण 14 सार्वजनिक तलाव आहेत. त्यापैकी कासारवाडी, पिंपरी गाव, यमुनानगर, नेहरूनगर, निगडी, पिंपळे गुरव, व वडमुखवाडी हे सात सार्वजनिक जलतरण तलाव खासगी संस्थांना पीपीपी तत्वावर चालविण्यासाठी देण्यात येणार आहेत. तलावरील वाढता खर्च कमी करण्यासाठी पालिकेने हे पाऊल उचलले आहे.

 

Back to top button