पिंपरी : पालखी सोहळ्यात इच्छुकांची चमकोगिरी | पुढारी

पिंपरी : पालखी सोहळ्यात इच्छुकांची चमकोगिरी

पिंपरी : महापालिका निवडणुका येत्या काही महिन्यांमध्ये लागू शकतात. त्यामुळे राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि इच्छुक उमेदवारांनी संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे औचित्य साधून गेल्या दोन दिवसांत ‘चमकोगिरी’ करण्यावर भर दिला.

मंगळवारी निगडी येथील भक्ती-शक्ती उद्यान चौकात संत तुकाराम महाराज पालखीच्या स्वागतासाठी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी स्वागतकक्ष उभारले होते. तर, बुधवारी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी दिघी मॅगझिन चौक येथेही भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी स्वागतकक्ष उभारले होते. त्याशिवाय, विविध इच्छुकांनी देखील स्वागतकक्ष उभारून मुहूर्त साधला.

महापालिका निवडणुका येत्या काही महिन्यांत लागू शकतात. ओबीसी आरक्षणाशिवाय तातडीने निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आहे. तर, पावसाचे कारण देत संपूर्ण राज्यासाठी तातडीने निवडणूक कार्यक्रम जाहीर करणे अडचणीचे ठरू शकते, असे राज्य निवडणूक आयोगाने म्हटले आहे. त्यावर राज्यात ज्या ठिकाणी कमी पाऊस पडतो, त्या ठिकाणी निवडणुका घेण्यास काय हरकत आहे, असा सवाल सर्वोच्च न्यायालयाने केलेला आहे. तसेच पावसाबाबत जिल्हानिहाय आढावा घेऊन निवडणूक कार्यक्रम जाहीर करा, असे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे कोणत्याही क्षणी निवडणूक कार्यक्रम जाहीर होऊ शकतो.

ही बाब लक्षात घेता शहरातील विविध राजकीय पक्षांनी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने आवश्यक तयारी केली आहे. पालखी सोहळ्यानिमित्त विविध इच्छुक उमेदवारांनी वारकर्‍यांसाठी पाणी बॉटल, ब्लँकेट, टी शर्ट, शेंगदाणा चिक्की, राजगिरा लाडू, केळी, चहा, औषधे आदींचे वाटप केले. काही इच्छुकांनी मोबाईल चार्जिंगची सुविधा देऊ केली. भक्ती-शक्ती चौक आणि दिघी मॅगझिन चौकात पालखीच्या स्वागताचे फ्लेक्स लावून वारकरी व भाविकांचे लक्ष वेधून घेतले. एकंदरितच इच्छुक उमेदवारांनी ‘चमकोगिरी’ करून घेतली.

Back to top button