वारकर्‍यांच्या गर्दीने फुलले शहरातील रस्ते | पुढारी

वारकर्‍यांच्या गर्दीने फुलले शहरातील रस्ते

पुणे : पुढारी वृत्तसेवा: टाळ-मृदंगाच्या तालावर… हाती भगव्या पताका… सोबतीला ग्यानबा तुकाराम… ज्ञानोबा माउलींचा जयघोष करीत वैष्णवांचा मेळा बुधवारी रात्री उशिरा पुण्यात विसावला. तत्पूर्वी लक्ष्मी रस्ता आणि फर्ग्युसन रस्ता भाविक आणि वारकर्‍यांच्या गर्दीने फुलून गेला होता. भक्तीने भारलेल्या वातावरणात आनंदाने तल्लीन झालेले पालखी सोहळ्यातील वारकरी जसजसे फर्ग्युसन रस्त्याने आणि लक्ष्मी रस्त्याने जात होते. तसतशी पुणेकर भाविकांची पालख्यांच्या दर्शनाची उत्सुकता शिगेला पोहोचत होती. संत तुकाराम महाराजांची पालखी सायंकाळी 5 वाजून 36 मिनिटांनी, तर संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी 7 वाजून 14 मिनिटांनी वाकडेवाडी येथील पाटील इस्टेट चौकात पोहोचली.

दोन्ही पालख्या सायंकाळी 8 च्या सुमारास फर्ग्युसन रस्त्यावर पोहोचल्या. त्यांची आरती झाल्यानंतर त्या तेथून पुढे मुक्कामाच्या दिशेने निघाल्या. फर्ग्युसन रस्त्यावर तुकाराम महाराजांच्या मंदिरात आरती झाली, तर याच रस्त्यावर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिरात आरती झाली. रात्री साडेनऊ वाजता संत तुकाराम महाराजांची पालखी निवडुंग्या विठोबा मंदिरात मुक्कामाला पोहोचली.

संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी भवानी पेठेत रात्री 10 वाजता विठोबा मंदिरात पोहोचली. दहिभाताचा नैवेद्य दाखविण्यात आला. त्यानंतर रात्री उशिरा दर्शनबार्‍या सुरू झाल्या. पालखी पुण्यात दोन दिवस मुक्कामी असणार आहे. राज्यातील राजकीय घडामोडींचे दिवसभर वार्तांकन करण्यात गुंग झालेल्या वृत्तवाहिन्यांना राज्यातील सर्वांत मोठ्या पालखी सोहळ्याचा विसर पडल्याचे बुधवारी दिसून आले.

हेही वाचा

नाशिक : कारच्या धडकेने रिक्षातील प्रवासी महिला ठार

नगर : चिंचपूर पांगुळ परिसरात पाऊस

२० आमदार आमच्या संपर्कात : संजय राऊत यांचा दावा

Back to top button