पुणे : भल्या पहाटे प्रत्येकाने साधला योग, विविध वर्गाने एकत्र येत साजरा केला योग दिन | पुढारी

पुणे : भल्या पहाटे प्रत्येकाने साधला योग, विविध वर्गाने एकत्र येत साजरा केला योग दिन

कोथरूड : ‘ योग हा कोणत्याही धर्माशी निगडित नाही, तर स्वकल्याणाचे ते एक श्रेष्ठ विज्ञान आहे. योगासनांमुळे आयुष्यात सकारात्मक बदल झाले आहेत. मोबाईलप्रमाणे शरीरालाही व्यायामाचे चार्जिंग आवश्यक असून प्रत्येकाने व्यायामासाठी दररोज वेळ काढलाच पाहिजे,’ असे मत आचार्य केदारनाथ पारगावकर यांनी व्यक्त केले. योगदिनानिमित्त ते बोलत होते. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त व आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून वेदान्त सांस्कृतिक मंच व संकल्प प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने योग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

Gold prices today : सोने, चांदी स्वस्त, जाणून घ्या प्रति तोळ्याचा दर

प्रात्यक्षिके, शास्त्रशुद्ध सूर्यनमस्कार व प्राणायाम करून घेण्यात आले. योग शिक्षक मनाली देव यांनी कलात्मक योग सादर केले. विनायक मुसळे व अलका जाधव यांनी आयुष मंत्रालय पुरस्कृत आसने करवून घेतली. मनोज साळी यांनी शास्त्रशुद्ध सूर्यनमस्काराचा सराव करून घेतला. वेदान्त सांस्कृतिक मंचचे विनायक बेहेरे यांनी योग उपक्रमाची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयश्री धुपकर यांनी केले, तर सतीश आठवले यांनी आभार मानले.

विश्व कल्याण मंत्र व शांती मंत्राने कार्यक्रमाची सांगता झाली.

कर्मवीर भाऊराव पाटील विद्यामंदिर

धनकवडी : भारती विद्यापीठाचे कर्मवीर भाऊराव पाटील विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेज धनकवडी या विद्यालयांत आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यालयातील योग प्रशिक्षक सुनील भालेराव व क्रीडा शिक्षक सुभाषलाल साने यांनी अनुलोम-विलोम, भामरी भस्त्रिका, शीतली इत्यादी प्राणायामाचे प्रकार व सूर्यनमस्कार, ताडासन, मयूरासन, सिंहासन यांसारखे आसनांचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांकडून करून घेतले. या प्रसंगी प्राचार्य विकास आबदर यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमास विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर सेवक उपस्थित होते.

शंकरराव मोरे विद्यालय
पौड रोड : भारती विद्यापीठाचे शंकरराव मोरे विद्यालय व लोकनेते सुबराव कदम ज्युनिअर कॉलेज येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा झाला. या कार्यक्रमासाठी योग प्रशिक्षिका वृंदा पाचवाघ व शिवानी तळेकर मार्गदर्शक म्हणून उपस्थित होत्या. विद्यालयाचे क्रीडा विभागप्रमुख अरुण माने यांनी योग प्रशिक्षणाची प्राचीन परंपरा सांगितली. तर, प्राचार्य अप्पा नलगे यांनी योग हा निरोगी जीवनाचा आरोग्य मंत्र असून, योगा ही भारताने जगाला दिलेली देणगी आहे, असे सांगितले. योगशिक्षक स्वप्नील शिंदे यांनी व्यायामातील झुम्बा डान्सचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांकडून करून घेतले. नानासाहेब गायकवाड यांनी आभार मानले. महादेव विभुते यांनी सूत्रसंचालन केले.

निवासी मतिमंद विद्यालय
धायरी : सिंहगड रोड परिसरातील श्री छत्रपती प्रतिष्ठान संचालित निवासी मतिमंद विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक शशिकांत गाडेकर, उमेश भोजपुरे, संतोष खिलारे, हसीना मगदूम, उषाताई पोवार,
सुरेश म्हस्के, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

अभिनव एज्युकेशन सोसायटी
धनकवडी : अभिनव एज्युकेशन सोसायटीच्या इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनिअर कॉलेजमध्ये पूर्वप्राथमिक विभागापासून कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत योग दिन साजरा करण्यात आला. राजीव जगताप म्हणाले की, आपली रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी प्रत्येकाने दिवसातील काही वेळ योगाभ्यासासाठी देण्याची गरज असल्याचे सांगितले.

नारायणराव सणस विद्यालय
धायरी : वडगाव खुर्द येथील रयत शिक्षण संस्थेच्या नारायणराव सणस विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिनाला सुमारे 2000 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. या प्रसंगी विद्यार्थ्यांनी पद्मासन, बद्धपद्मासन, मयूरासन, ताडासन, शीर्षासन, धनुरासन, वज्रासन, भुजंगासन इत्यादी विविध प्रकारची योगासने मोठ्या उत्साहाने केली. कार्यक्रमाचे नियोजन राजेंद्र देशपांडे यांनी केले. या वेळी तानाजी खोमणे, संतोष राऊत, नितीन पाटील, रितेश नागटिळक यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

लोहगावचे कर्मभूमीनगर
येरवडा : जागतिक योग दिनानिमित्त लोहगावमधील कर्मभूमीनगरमध्ये योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी योग प्रशिक्षिका सुजाता देवराम आणि विष्णू कुमार यांनी नागरिकांना योगाचे धडे दिले. अतिशय उत्साही वातावरणात योग दिन साजरा करण्यात आला. या वेळी मोहनराव शिंदे, सुनील खांदवे, मदन मोहन ठाकूर, डी. सिंग, प्रफुल्ल देवराम, परशुराम नुला, आदी उपस्थित होते.

नर्‍हे येथील सिग्नेट शाळेत उत्साह
धायरी : आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधत जे .एस.पी .एम .संस्थेच्या नर्‍हे येथील सिग्नेट पब्लिक शाळेत विद्यार्थ्यांनी सामूहिकरित्या समक्रमित सूर्यनमस्कार घालून योग दिन उत्साहात साजरा केला. यावेळी योग शिक्षिका कविता धर्माधिकारी यांनी योगाचे जीवनातील महत्त्व विशद केले. योगाद्वारे आपण शरीर,मन यावर ताबा ठेवू शकतो व जीवन सुखकारक करू शकतो असा संदेशही दिला. या उपक्रमा अंतर्गत शाळेच्या विद्यार्थ्यांनी योगाची विविध प्रात्यक्षिके दाखवली .

Back to top button