पिंपरी: पालखीच्या स्वागतासाठी वारकरी आतुर | पुढारी

पिंपरी: पालखीच्या स्वागतासाठी वारकरी आतुर

पिंपरी: कोरोनाच्या संकटामुळे गेली दोन वर्ष होऊ न शकलेली पंढरीची वारी यावेळी घडणार व पांडुरंगाचे दर्शन होणार, या भावनेने वारकरी आनंदून गेले आहेत. पालखीचा आनंद शब्दात सांगता येणार नाही, अशा भावना शांताराम वाघेरे व संजीवनी पुनने यांनी ‘पुढारी’शी बोलताना व्यक्त केल्या.

सोमवार (दि.20) रोजी संत तुकाराम महाराज पालखीचे देहू येथून तर दि. 21 रोजी संत ज्ञानेश्वर माऊली पालखीचे आळंदीहून प्रस्थान होत आहे. गेले दोन वर्षे कोरोनामुळे पालखी सोहळा होऊ शकला नव्हता. यावेळी मात्र कोरोनाचे निर्बंध हटविण्यात आल्याने पायी वारीचा आनंद वारकर्‍यांना घेता येणार आहे.

गेली 29 वर्षे वारीमध्ये पायी जात असलेले शांताराम वाघेरे म्हणाले की, वारीला पायी जाण्याचा आनंद शब्दात सांगता येणार नाही. सकाळी सहा वाजता, काही ठिकाणी सात वाजता, पायी वारीत आंघोळ करायची गंध लावायचा. चहापाणी नाश्ता करून दिंडीला नंबरप्रमाणे लागायचे. विणेकरी तुळस घेऊन चालणार्‍या वारकरी भगिनी, हा सारा पालखीचा आनंदसोहळा असतो. मी दरवर्षी संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात देहूपासून पायी वारी करतो. देहूला पालखीचे प्रस्थान होते. आकुर्डीला पालखी आली की, आम्ही पिंपरीला घरी येतो. दुसर्‍या दिवशी आकुर्डीतून पालखी देहूकडे निघते तेव्हा एच. ए. कंपनीजवळ पुन्हा दिंडीत सामील होतो. पुण्यात पालखी पोहोचते तेव्हा रेल्वेने घरी येतो.

पुन्हा माऊलींच्या पालखीबरोबर हडपसरपर्यंत पायी जातो. तिथून विसावा घेतल्यानंतर माऊलींची पालखी सासवडमार्गे निघते. त्या पालखीच्या मागे संत तुकाराम महाराज पालखी असते. त्या पालखीबरोबर हडपसरला 49 नंबरच्या दिंडीला आम्ही सामील होतो. पालखीचा आनंद शब्दात सांगता येणार नाही. शिस्त आणि भक्तीचा हा सोहळा अवर्णनीय असून गेली दोन वर्ष कोरोनामुळे पालखी सोहळा होऊ शकला नव्हता. यावेळी हा सोहळा अनुभवता येणार असल्याचा आनंद आहे.

संजीवनी पुनने म्हणाल्या की, पालखी सोहळ्यात देहूपासून पंढरपूरपर्यंत पायी वारीचा अनुभव शब्दात सांगता येणार नाही. प्रत्यक्ष पाहिल्यावरच व अनुभवल्यावरच पालखीचा आनंद समजतो. आमच्या पिंपरी गावातील दिंडी पंढरपूरपर्यंत पायी जाते. अतिशय भक्तीमय वातावरणात जीव रमून जातो. घरातल्या आठवणी बाजूला ठेवून पांडुरंग चरणी लीन होता येते. गेली दोन वर्षे कोरोनामुळे पालखी सोहळा होऊ शकला नव्हता. त्यामुळे यावेळी पालखी सोहळ्यात मोठा उत्साह असेल. मोठ्या संख्येने वारकरी सामील होतील. वारीत सारे वारकरी एकत्रच असतात.

Back to top button