पुणे : सिंहगडावर धिंगाणा घालणार्‍या मद्यपींना अटक | पुढारी

पुणे : सिंहगडावर धिंगाणा घालणार्‍या मद्यपींना अटक

वेल्हे : पुढारी वृत्तसेवा : सिहगड किल्ल्याच्या तानाजी मालुसरे कड्याच्या बुरुजावर शनिवारी (दि. 18) सकाळी दारू पिऊन धिंगाणा घालणार्‍या दोन पर्यटकांना जेरबंद करण्यात आले. गडावर दारू तसेच मांसाहार करण्यास बंदी असतानाही हे पर्यटक दारू व मांस घेऊन गडावर आले होते. रवींद्र रामचंद्र नेवासेकर (वय 34), सुभाष मच्छिंद्र देवकर (वय 35, दोघेही रा. अहमदनगर) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्याजवळ दारूच्या दोन रिकाम्या बाटल्या सापडल्या. हवेली पोलिस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेवासेकर, देवकर व कारचालक असे तिघेजण कार (एमएच 23 एएस 9727) मधून सकाळीच गडावर आले होते. तानाजी मालुसरे कड्यालगतच्या बुरुजावर बसून काही पर्यटक दारू पिऊन धिंगाणा घालत असल्याचे काही पर्यटकांनी पाहिले. त्यांनी या मद्यपींना हटकले. त्यांच्याजवळील दारूच्या बाटल्या पर्यटकांनी घेतल्या.

पनवेल : कर्नाळा पक्षी अभयारण्यात ट्रेकर्सचा हृदयविकाराने मृत्यू

त्यानंतर तिघेही सैरावैरा धावत पुणे दरवाजाने वाहनतळावर आले. या घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे सुरक्षारक्षक रोहिदास मुजुमले यांच्यासह कर्मचार्‍यांनी गडावर धाव घेतली. तोपर्यंत कारमध्ये बसून तिघेही जण पसार झाले. ते घाट रस्त्याने खाली येत असल्याची माहिती राहुल मुजुमले यांनी डोणजे-गोळेवाडी टोलनाक्यावर दिली.

सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास टोलनाक्यावर नाकाबंदी करून वनविभागाचे वनरक्षक बाळासाहेब जिवडे, नितीन गोळे व सुरक्षारक्षकांनी मद्यपींची कार अडवली. कारचालकासह तिंघाना जेरबंद करून हवेली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. हवेली पोलिस ठाण्याचे प्रदीप ताकवणे यांच्या पथकाने दोघा मद्यपींना वैद्यकीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात दाखल केले. तपासणी अहवालानंतर त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याचे हवेली पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी वनरक्षक संदीप भानुदास कोळी यांनी फिर्याद दिली आहे.

गडावर मांसाहार, सिगारेट, दारू पिण्यास बंदी आहे. पहाटेच्या सुमारास मद्यपी गडावर गेले होते. दारू पिऊन ते धिंगाणा घालत होते. त्यांच्याविरोधात वनविभागाने तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी कारवाई केली आहे. असे प्रकार रोखण्यासाठी वनविभागाने घाट रस्त्याच्या दोन्ही तपासणी नाक्यावर यंत्रणा उभी केली आहे. पहाटे नाक्यावर कोणी नसताना गडावर पर्यटक जातात, त्यामुळे योग्य ती खबरदारी घेतली जाणार आहे.
– बाबासाहेब लटके, वनपरिमंडल अधिकारी, सिंहगड वनविभाग.

Back to top button