आता बेशिस्त चालकांना लगाम; स्वारगेट चौकातील सततच्या वाहनकोंडीने त्रस्त यंत्रणा एकवटल्या | पुढारी

आता बेशिस्त चालकांना लगाम; स्वारगेट चौकातील सततच्या वाहनकोंडीने त्रस्त यंत्रणा एकवटल्या

पुणे, पुढारी वृत्तसेवा: स्वारगेट चौकातील सततच्या वाहनकोंडीने त्रस्त शहरातील सर्व वाहतूक यंत्रणा आता एकत्र झाल्या आहेत. त्यांच्याकडून करण्यात येणार्‍या विविध उपाययोजनांमुळे लवकरच येथील वाहतूक कोंडी कमी होईल. शिवाय बेशिस्त वाहनचालकांना लगाम बसणार आहे. पीएमपी, एसटी, मेट्रो, आरटीओ, महापालिका, वाहतूक पोलिस, रिक्षा संघटना, ट्रॅव्हल्स संघटना यांची स्वारगेट पोलिस स्टेशन येथे गुरुवारी सायंकाळी बैठक पार पडली.

या बैठकीला सर्व वरिष्ठ अधिकार्‍यांनी हजेरी लावली. यावेळी सहाय्यक पोलिस आयुक्त सुषमा चव्हाण, वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक इंदलकर, पोलिस निरीक्षक गुन्हे सोमनाथ जाधव, पोलिस निरीक्षक (वाहतूक) अरुण हजारे, एसटीचे विभाग नियंत्रक रमाकांत गायकवाड, विभागीय वाहतूक अधिकारी ज्ञानेश्वर रणावरे, पीएमपीचे वाहतूक व्यवस्थापक दत्तात्रय झेंडे, शिवनेरी रिक्षा संघटनेचे अशोक साळेकर, ट्रॅव्हल्स संघटनांचे पदाधिकारी आणि महापालिकेचे अधिकारी, अतिक्रमण विरोधी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
वरील सर्व यंत्रणांतील प्रमुख अधिकारी शुक्रवारी (दि. 17) स्वारगेट चौकाची पाहणी करणार आहेत.

लोणावळा :लोकअदालतीमध्ये 422 दाखलपूर्व प्रकरणे निकाली

स्वारगेट चौक घेणार आता मोकळा श्वास

स्वारगेट चौकात अतिक्रमण झाल्याने पादचारी मार्गावरून जाताना नागरिकांना अडथळ्यांचा सामना करावा लागतो. त्यामुळे नाईलाजास्तव पादचारी मुख्य रस्त्यावरून चालतात. परिणामी मागून येणार्‍या वाहनांना अडथळा होऊन वाहतूक कोंडीत भर पडते. त्या पार्श्वभूमीवर आता येथील अतिक्रमणे हटवणे व हातगाड्या अन्यत्र हलविण्याचे नियोजन आहे.

खासगी वाहनांना बस स्थानकात नो एंट्री

स्वारगेट एसटी स्थानकात अनेक खासगी वाहनांची मोठ्या प्रमाणावर घुसखोरी वाढली आहे. त्याला आता लगाम लागणार आहे. एसटीकडून आतमध्ये येणार्‍या वाहनांवर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच, अंतर्गत आणि बाहेर पडताना एसटी चालकांना वाहतूक कोंडी न करता गाड्या व्यवस्थित रांगेत बाहेर काढण्यासंदर्भात सूचना दिल्या जाणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.

पिंपरी : शिवसेनेचे ओझे राष्ट्रवादी खांद्यावर घेणार का?

पीएमपीच्या गाड्या थांबणार शिस्तीत!

पीएमपीची स्वारगेट चौकातील स्थानकाची जागा मेट्रोच्या कामासाठी वापरली गेली आहे. त्यामुळे पीएमपीच्या गाड्या आता रस्त्यावरच अस्ताव्यस्त लागतात. येथे मोठी कोंडी होत आहे. येथील गाड्यांचे नियोजन करण्यात येणार असून, चालकांना सूचना देण्यात येणार आहे. कात्रजकडे जाताना स्वारगेट चौकातील पीएमपीच्या थांब्याचे ठिकाण चुकले आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे. हे ठिकाण बदलण्याचे नियोजन केले आहे.

बेशिस्त ट्रॅव्हल्स, रिक्षाचालकांमुळे कोंडी!

रात्रीच्या वेळी स्वारगेट चौकात लागणार्‍या ट्रॅव्हल्स बसमुळे मोठी कोंडी होत असते. त्यामुळे येथे ट्रॅव्हल्स गाड्या उभ्या करण्यावर बंदी करण्यात येणार आहे. त्यासंदर्भात नियोजन सुरू आहे. तसेच, स्वारगेट चौकात बेशिस्त रिक्षाचालकांमुळेदेखील वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे प्रमाणापेक्षा जास्त रिक्षांना याठिकाणी थांबू न देण्याबाबत विचार सुरू आहे.

चौक परिसराची आज एकत्रित पाहणी

पीएमपी, एसटी, मेट्रो, आरटीओ, महापालिका, वाहतूक पोलिस, रिक्षा संघटना, ट्रॅव्हल्स संघटना यांचे अधिकारी व पदाधिकारी यांची स्वारगेट पोलिस स्टेशन येथे गुरुवारी सायंकाळी बैठक पार पडली. स्वारगेट चौकातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी विविध स्तरावर नियोजन करण्यात येणार आहे. त्याचाच भाग म्हणून शुक्रवारी (दि.17) स्वारगेट चौकाची या सर्व यंत्रणांकडून एकत्रित पाहणी केली जाणार आहे.

हेही वाचा

धुळे : तापी नदीत उडी टाकून माय-लेकाची आत्महत्या

बांदा : गोवा दारूसह कार जप्त ; तरुणावर गुन्हा

कुडाळ : सुभाष मडव, महादेव सावंत यांचे भाजपातून 6 वर्षांसाठी निलंबन

Back to top button