बांदा : गोवा दारूसह कार जप्त ; तरुणावर गुन्हा | पुढारी

बांदा : गोवा दारूसह कार जप्त ; तरुणावर गुन्हा

बांदा : पुढारी वृत्तसेवा

गोवा राज्यातून सिंधुदुर्गमार्गे छुप्या पध्दतीने बेकायदेशीर रित्या केल्या जाणार्‍या गोवा दारू वाहतूकीविरोधात राज्य उत्पादन शुल्क विभाग कुडाळ पथकाने सापळा रचून कारवाई केली. या कारवाईत 2 लाख रुपये किमतीची दारू व स्विफ्ट कार, असा 6 लाख 67 हजार 360 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. तर विनापरवाना बेकायदा दारू वाहतूक केल्याप्रकरणी चालक श्रीकृष्ण सुभाष कदम (32, रा.अणाव, हुमरमळा, ता.कुडाळ) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. कारवाई चराठा येथे बुधवारी सायंकाळी उशिरा करण्यात आली. सलग दोन दिवस राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केल्याने अवैध दारू वाहतूकदारांचे धाबे दणाणले आहेत.

गोव्यातून ओटवणेमार्गे चोरटी दारू वाहतूक होत असल्याची खात्रीलायक माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कुडाळ येथिल भरारी पथकाला मिळाली होती. त्यानुसार भरारी पथकाने सायंकाळी त्या मार्गावर सापळा रचला होता. दरम्यान सावंतवाडीच्या दिशेने जाणार्‍या एक कार या पथकातील कर्मचार्‍यांनी थांबवली. या गाडीची तपासणी केली असता त्यात विनापरवाना गोवा दारू आढळून आली. याबाबत गुन्हा दाखल करून मुद्देमालासह श्रीकृष्ण सुभाष कदम याला ताब्यात घेतले. ही कारवाई विभागीय उपायुक्त बी. एच. तडवी यांचे मार्गदर्शनाखाली निरीक्षक राज्य उत्पादन शुल्कचे अमित पाडाळकर, दुय्यम निरीक्षक डी. एम. वायदंडे, मयुरी चव्हाण, एच. आर. वस्त यांनी केली.

Back to top button