दौंड: तोतया पोलिस आले आणि सव्वा कोटी लुटून नेले | पुढारी

दौंड: तोतया पोलिस आले आणि सव्वा कोटी लुटून नेले

पाटस, पुढारी वृत्तसेवा:  चार तोतया पोलिस एस. टी. बसमध्ये घुसले आणि त्यांनी निलंगा ते भिवंडी मार्गावर प्रवास करणाऱ्या चार प्रवाशांना मारहाण करून त्यांची रोकड लुटली. तोतया पोलिस तब्बल १ कोटी १२ लाख ३६ हजार ८६० रुपयांचा ऐवज लुटून पसार झाले.

ही घटना सोमवारी (ता.२) मध्यरात्री सव्वा वाजण्याच्या सुमारास पुणे-सोलापूर महामार्गावर पाटस (ता. दौंड) टोलनाक्याजवळ घडली.

तुम्ही दोन नंबरचा धंदा करता काय… चला उतरा खाली…’ असे म्हणत तोतया पोलिस मसमध्ये घुसले. या प्रवाशांना खाली उतरवून त्यांना लुटले.

हितेंद्र बाळासाहेब जाधव यांनी यवत पोलिस ठाण्यात यासंबंधी फिर्याद दिली आहे.

संबधित प्रवासी हे कुरिअर कंपनीचे असून त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम होती.

हितेंद्र जाधव यांच्याकडील २६ लाख रुपये रोख व १० हजार रुपयांचा मोबाईल, तेजस धनाजी बोबडे यांच्याकडील २५ लाख ६२ हजार ५७० रुपये लुटले.

विकास जनार्दन बोबडे यांच्याकडील २९ लाख ४९ हजार ८६० रुपये रोख व १ लाख १५ हजार रुपये किमतीचे मेटल पार्सल लंपास केले.

संतोष मनोहर बोबडे यांच्याकडील ३० लाख रुपये व १५० ग्रॅम वजनाचे मेटल पार्सल अशी एकूण १ कोटी १२ लाख ३६ हजार ८६० रुपयांची रोख रक्कम व मेटल पार्सल असा ऐवज या चोरट्यांनी चोरून नेला.

लुटण्यात आलेले प्रवासी एस.टी. बसमध्ये होते. ही बस सोमवारी सायंकाळी ५.३० वाजता लातूर येथून निघाली होती.

सोलापूर येथे विकास जनार्दन बोबडे, तर इंदापूर येथे संतोष मनोहर बोबडे हे एस.टी.मध्ये बसले.

बस मध्यरात्री एकच्या सुमारास पाटस (ता.दौंड) येथील टोलनाका सोडल्यानंतर पुण्याच्या दिशेला दोन ते अडीच किलोमीटरवर ढमाले वस्तीजवळ थांबली.

त्यावेळी तीन चोरटे बसमध्ये चढले.

त्यातील एकाने वाहकाला बसमध्ये पास असलेले कोण आहेत असे विचारले. वाहकाने त्यांना पास असलेले मागे बसलेले आहेत असे सांगितले.

त्यानंतर ते हितेंद्र जाधवकडे आले व म्हणाले की,‘तुम्ही दोन नंबरचा धंदा करताय, तुमची टीप होती, तुम्ही आज सापडलात.’ असे म्हणून फायबर काठीने जाधवना मारहाण करून जाधव आणि इतर तिघांना खाली उतरवले.

खाली उतरवत असतानाच तेजस धनाजी बोबडे याचा मोबाईल काढून घेतला. चौघेही खाली उतरल्यानंतर चोरट्यांनी त्यांना महामार्गाच्या सेवा रस्त्यावर नेऊन शिवीगाळ करून मारहाण केली.

या प्रवाशांना खाली उतरवल्यावर एस.टी. बस लगेच निघून गेली. त्यानंतर त्यांनी या चौघांकडील ऐवज काढून घेतला.

‘तुम्हाला पोलिस स्टेशनला गेल्यावर दाखवतो, तुम्ही दोन नंबरचे काम करताय, पेट्रोलिंगची गाडी येत आहे,’ असा दम देऊन चोरटे बुलेट मोटारसायकलवरून दोघे जण पुण्याच्या दिशेने, तर दुसर्‍या पांढर्‍या रंगाच्या स्कूटीसारख्या गाडीवरून दोघे जण सोलापूरच्या दिशेने जाण्याच्या तयारीत होते.

यावेळी जाधव यांना हे पोलिस नसावेत, असा संशय आल्याने त्यांनी इतर तिघांच्या मदतीने त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र हिसडा देऊन ते गाडीवरून निघून गेले.

या घटनेचा तपास यवत पोलिस ठाण्याचे निरीक्षक भाऊसाहेब पाटील करीत आहेत. घटनेच्या तपासासाठी तीन पोलिस पथके रवाना करण्यात आली आहेत.

दौंड उपविभागीय अधिकारी राहुल धस, पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट, यवत पोलिस निरीक्षक भाऊसाहेब पाटील, उपनिरीक्षक संजय नागरगोजे यांनी घटनास्थळी भेट दिली.

प्रवाशांनी पोलिसांना दिले चोरट्यांचे वर्णन

एक जण शरीराने धिप्पाड, उंच, रंगाने काळा, नाक सरळ, चेहरा उभा, डोळे मोठे, अंगामध्ये काळे जर्किन, खाकी पॅन्ट व हातात फायबरची काठी.

दुसरा मध्यम शरीरयष्टी, अंगावर खाकी रंगाचे कपडे, कमी उंचीचा, तिसरा मध्यम उंचीचा, गोल चेहरा व चौथा मध्यम शरीरबांधा असलेला अशा वर्णनाचे चोरटे होते.

 

 

Back to top button