विरोधक संसदेबाहेर भरवणार प्रतिसंसद : राहुल गांधींच्या ब्रेकफास्ट मिटिंगला विरोधी पक्षांतील नेते उपस्थित राहणार | पुढारी

विरोधक संसदेबाहेर भरवणार प्रतिसंसद : राहुल गांधींच्या ब्रेकफास्ट मिटिंगला विरोधी पक्षांतील नेते उपस्थित राहणार

नवी दिल्ली; वृत्तसंस्था :  विरोधकांची प्रतिसंसद  : एकीकडे पावसाळी अधिवेशनात संसदेतील गदारोळामुळे कामकाज होऊ शकलेले नाही. त्यातून केंद्र सरकार आणि विरोधकांनी परस्परांवर आरोप केलेले आहेत. दरम्यान, विरोधकांना अपेक्षित असलेल्या पेगासस हेरगिरी, सुधारित कृषी कायद्यांवर चर्चा होत नसल्याने विरोधकांनी आज (मंगळवार) संसदेबाहेर प्रतिसंसद चालविण्याचे ठरवले आहे.

संसदेचे कामकाज सुरू होण्यापूर्वी विरोधी पक्षांतील नेत्यांची दिल्लीतील कॉन्स्टिट्युशन क्‍लबमध्ये बैठकही होणार आहे.

राहुल गांधी यांनी मंगळवारी विरोधी पक्षांच्या नेत्यांना ब्रेकफास्टचे आमंत्रण दिले आहे. सकाळी 9 वाजता कॉन्स्टिट्युशन क्लबमध्ये होणार्‍या बैठकीत काँग्रेसच्या खासदारांसह इतर विरोधी पक्षांचे नेतेही उपस्थित राहणार आहेत.

याच बैठकीत संसदेबाहेर विरोधकांची प्रतिसंसद चालविण्याच्या निर्णयावर विरोधी पक्षांकडून शिक्‍कामोर्तब केले जाऊ शकते.

19 जुलैपासून संसदेच्या पावसाळी अधिवेशनास सुरुवात झाली आहे. गेल्या दोन आठवड्यांत 107 पैकी केवळ 18 तास कामकाज झाले आहे.

त्यामुळे 133 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. संसदेत विरोधकांचा आवाज दाबला जात आहे, असा विरोधकांचा आरोप आहे,

तर विरोधकच गदारोळ करत असल्याचा आरोप सत्ताधार्‍यांकडून केला जात आहे. दरम्यान, अधिवेशन 13 ऑगस्टपर्यंत चालणार आहे.

याआधी बुधवारी पेगासस हेरगिरी आणि कृषी कायद्यांबाबत अनेक मुद्द्यांवर मोदी सरकारला घेरण्यासाठी रणनीती आखण्यासाठी आणि भविष्यातील कार्यवाहीची रूपरेषा तयार करण्यासाठी दोन्ही सदनांतील विरोधी पक्षांच्या नेत्यांनी बैठक घेतली होती. या बैठकीत राहुल गांधीही सहभागी झाले होते.

12 विधेयके चर्चेविना मंजूर

संसदेचे कामकाज होत नसले, तरी गदारोळातच संसदेत सरकार विधेयके संमत करत आहे.

कोणतीही चर्चा न होता ही विधेयके मंजूर केली जात आहेत. अशी 12 हून अधिक विधेयके या काळात मंजूर झाली आहेत.

सरकार असेच गदारोळाआडून विधेयके मंजूर करणार असेल, तर रणनीती बनविणे गरजेचे आहे, असे विरोधकांचे मत आहे.

राहुल गांधी यांनी बोलावलेल्या मंगळवारच्या ब्रेकफास्ट मिटिंगमध्ये 14 हून अधिक विरोधी पक्षांतील नेते आणि खासदार सहभागी होतील. संसदेत ज्याप्रमाणे सर्वपक्षीय बैठक होते, तशीच बैठक होणार आहे.

– मल्‍लिकार्जुन खरगे,
काँग्रेसचे राज्यसभेतील गटनेते

Back to top button