रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा : बारावीच्या परीक्षेचा ऑनलाइन निकाल मंगळवार दि. 3 रोजी जाहीर करण्यात आला आहे. यंदा राज्याचा एकूण निकाल 99.63 टक्के एवढा लागला असून, यामध्ये कोकण विभागाचा सर्वाधिक 99.81 टक्के निकाल लागला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत निकालात 3.92 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बारावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. अंतर्गत मूल्यमापनाद्वारे निकाल लावण्याचे निकष तयार करून त्याची अंमलबजावणीही करण्यात आलेली आहे. दहावीसाठी 30 टक्के, अकरावीसाठी 30 टक्के, बारावीसाठी 40 टक्के याप्रमाणे 100 टक्के गुणाप्रमाणे मुल्यमापनाद्वारे मंगळवार दि. 3 रोजी ऑनलाईन निकाल जाहीर करण्यात आला आहे.
या परीक्षेसाठी कोकण मंडळामध्ये एकूण 27 हजार 384 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यामध्ये 13 हजार 887 मुले, तर 13 हजार 497 मुलींचा समावेश आहे. त्यापैकी 27 हजार 332 विद्यार्थी उत्तीर्ण झाले़ मुलांची उत्तीर्णतेची संख्या 13 हजार 854 असून, त्यांचे शेकडा प्रमाण 99.76 टक्के आहे़ मुलींची उत्तीर्णतेची संख्या 13 हजार 478 असून, त्यांचे शेकडा प्रमाण 99.85 टक्के आहे़
रत्नागिरी जिल्ह्याचा निकाल 99.92 टक्के लागला असून, जिल्ह्यातून एकूण 17 हजार 682 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 17 हजार 668 विद्यार्थी उत्तीर्ण झाले़ यामध्ये 8 हजार 925 मुले, तर 8 हजार 743 मुलींचा समावेश आहे़ मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी 99.96 टक्के असून, मुलांची 99.87 टक्के एवढी आहे़
सिंधुदुर्ग जिल्ह्याची उत्तीर्णतेची टक्केवारी 99.60 एवढी आहे. या जिल्ह्यात एकूण 9 हजार 702 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 9 हजार 664 विद्यार्थी उत्तीर्ण झाले़ यामध्ये 4 हजार 929 मुले, तर 4 हजार 735 मुलींचा समावेश आहे़ मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी 99.66 टक्के असून, मुलांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण 99.55 टक्के आहे़ यंदाही निकालात मुलींनीच बाजी मारली आहे. राज्यात कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक तर औरंगाबाद या विभागाचा निकाल सर्वात कमी लागला आहे.
दोन्ही जिल्ह्यातून मिळून 567 विद्यार्थ्यांनी पुनर्परीक्षेसाठी नोंदणी केली होती. यामधून 559 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यात वाणिज्य आणि व्यावसायिक विषय शाखांचा निकाल 100 टक्के, विज्ञान शाखेचा 99.83 टक्के, कला शाखेचा 99.93 टक्के निकाल लागला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कला आणि व्यावसायिक शाखेचा निकाल 100 टक्के, वाणिज्य शाखेचा 99.97 टक्के तर विज्ञान शाखेचा 98.55 टक्के निकाल लागला आहे.
कोकण 99.81
पुणे 99.75
मुंबई 99.67
कोल्हापूर 99.67
लातूर 99.65
नागपूर 99.62
नाशिक 99.61
अमरावती 99.37
औरंगाबाद 99.34
कोकण विभागीय मंडळाच्या स्थापनेपासून मंडळाने बारावीच्या परीक्षेत सलग दहावेळा राज्यात अव्वल स्थान कायम राखले आहे़ सन 2012 – 86.25 टक्के, 2013 – 85.88 टक्के, 2014 – 94.85 टक्के, 2015 – 95.68 टक्के, 2016 – 93.29 टक्के, 2017 – 95.20 टक्के, 2018 – 94.85 टक्के, 2019- 93.23 टक्के व सन् 2020 ला 95.89 टक्के असा निकाल लागला आहे. यंदाच्या निकालात 3.92 टक्के वाढ झाली आहे.