ई-रुपी व्हाऊचर चे पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून लोकार्पण | पुढारी

ई-रुपी व्हाऊचर चे पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून लोकार्पण

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा :  केंद्र सरकारने ज्यावेळी डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी सुरू केला, तेव्हा काही राजकीय नेते आणि काही विशिष्ट प्रकारचे तज्ज्ञ त्याची खिल्ली उडवित असत. मात्र, आज सर्वसामान्य जनतेच्या आयुष्यात डिजिटल तंत्रज्ञानाने क्रांती घडविली असून गरिबांच्या प्रगतीमध्ये तंत्रज्ञानाची मोठी मदत होत आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी केले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ई-रुपी या विशेष प्रीपेड ई-व्हाऊचर व्यवस्थेचे ऑनलाईन पद्धतीने लोकार्पण केले.

यावेळी पंतप्रधान म्हणाले, देशात सध्या डिजिटल क्रांती होत असून त्यामुळे गरिबांच्या जीवनात आमूलाग्र परिवर्तन घडत आहे.

देशात सध्या डिजिटल व्यवहारांचे नवे पर्व सुरू झाले आहे.

आज लोकार्पण करण्यात आलेल्या ई-रुपी डिजिटल व्हाऊचर व्यवस्थेमुळे डिजिटल व्यवहार आणि डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर व्यवस्था अधिक प्रभावी होणार आहे.

या व्यवस्थेंतर्गत सध्या केंद्र सरकारच्या आरोग्यविषयक योजनांसाठी या व्यवस्थेचा वापर केला जाणार आहे.

त्याचप्रमाणे एखादी संस्था अथवा संघटना कोणासाठी मदत करू इच्छित असतील तर रोख रकमेऐवजी ते ई-रुपी व्हाऊचर देऊ शकतील.

यामुळे ज्या कामासाठी आर्थिक मदत देण्यात आली आहे, ती त्याच कामी खर्च होण्याची खात्री मिळणार असल्याचे पंतप्रधान यावेळी म्हणाले. केंद्र सरकारच्या डिजिटल अभिनायानास अनेकांनी नावे ठेवल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.

ते म्हणाले, तंत्रज्ञान केवळ श्रीमंताच्या वापराची गोष्ट आहे, असा समज देशात द‍ृढ करण्यात आला होता. केंद्र सरकारने डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर सर्वसामान्य आणि गरीब जनतेच्या जीवनात परिवर्तन करण्यासाठी करण्यास सुरुवात केली.

त्यावेळी देखील अनेक राजकीय नेते, विशेष तज्ज्ञ नेते यांनी त्याची खिल्ली उडविली होती. मात्र, जनतेने त्यांना नाकारून त्यांची जागा दाखवून दिली.

देशात आज गरिबांच्या जीवनात आमुलाग्र परिवर्तन घडविण्यात डिजिटल तंत्रज्ञान महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचेही पंतप्रधानांनी यावेळी नमूद केले.

Back to top button