बारावीचा निकाल : दहावी पाठोपाठ बारावी सुसाट; गुणांची लयलूट | पुढारी

बारावीचा निकाल : दहावी पाठोपाठ बारावी सुसाट; गुणांची लयलूट

पुणे; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळांने मंगळवारी बारावीचा निकाल जाहीर केला. यानंतर आपला निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांची लगबग सुरू झाली.

यामध्ये शैक्षणिक संस्थांकडून दहावीप्रमाणेच बारावीच्या विद्यार्थ्यांवर देखील अक्षर:श गुणांची लयलूट केली. याचा सर्वाधिक फायदा कला शाखेच्या विद्यार्थ्यांना झाला असून गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यांचा टक्का तब्बल 17.20 टक्क्यांनी वाढला आहे.

त्यापाठोपाठ व्यवसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांचा टक्का वाढला असून त्यांचा निकाल 12.73 टक्क्यांनी वाढला आहे. त्यानंतर वाणिज्य आणि विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली आहे.

त्यामुळे मंडळाकडे असलेल्या 1977 च्या नोंदीपासून आत्तापर्यंत कधीही न लागलेला 99.63 टक्के निकाल जाहीर झाला आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत निकालात 8.97 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

राज्य मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी निकाल जाहीर केला. सचिव डॉ. अशोक भोसले यावेळी उपस्थित होते. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर यंदा पहिल्यांदाच बारावीची परीक्षा न घेता अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे निकाल जाहीर करण्यात आला.

नऊ विभागीय मंडळांमध्ये परीक्षेसाठी 13 लाख 19 हजार 754 नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 13 लाख 19 हजार 754 विद्यार्थ्यांची संपादणूक कनिष्ठ महाविद्यालयांकडून प्राप्त झाली. यातील 13 लाख 14 हजार 965 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

तर राज्यभरात 4 हजार 789 विद्यार्थी नापास आहेत. यंदाही विद्यार्थ्यांच्या तुलनेत विद्यार्थिनींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी 0.19 टक्क्याने अधिक आहे. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक तर त्याखालोखाल मुंबई, पुणे, कोल्हापूर, नागपूर, नाशिक विभागाने बाजी मारली आहे. तर औरंगाबाद विभागाचा निकाल सर्वांत कमी लागला आहे.

राज्य शिक्षण मंडळामार्फत 23 एप्रील ते 21 मे दरम्यान बारावीची परीक्षा घेण्यात येणार होती. परंतु कोरोनामुळे परीक्षा रद्द करण्यात आल्या आणि अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे बारावीचा निकाल जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला.

त्यानुसार विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापन करण्यासाठी आणि संगणकीय प्रणालीत ते नोंदविण्यासाठी मुदत देण्यात आली. कनिष्ठ महाविद्यालयांकडून संगणक प्रणालीमार्फत विद्यार्थ्यांचे गुण विभागीय मंडळाकडे पाठविण्यात आले.

त्यानंतर विभागीय मंडळाने कनिष्ठ महाविद्यालयांकडून आलेले गुण एकत्रित करून विद्यार्थ्यांचा अंतीम निकाल तयार करण्यासाठी राज्य मंडळाकडे पाठविला आणि राज्य मंडळाने 3 ऑगस्टला रोजी निकाल जाहीर केला.

अंतर्गत मूल्यमापनाचे अधिकार दिल्यामुळे महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांवर अक्षरश: गुणांची लयलूट केली.

परीणामी गेल्या वर्षीच्या तुलनेत उतीर्णांचा टक्का तर वाढलाच शिवाय 60 टक्के, 75 टक्के, 90 टक्के आणि 100 टक्के गुण मिळवणार्‍या विद्यार्थ्यांच्या संख्येत देखील लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून आले. त्यामुळे परीक्षा न देताच विद्यार्थ्यांची गुणवत्ता लक्षणीय सुधारल्याचे पहायला मिळाले.

एकूण 160 विषयांना सुधारित मूल्यमापन कार्यपध्दतीत निश्‍चित केलेल्या भारांशानुसार गुणदान करण्यात आले असून यामध्ये जवळपास 70 विषयांचा निकाल 100 टक्के लागला. गेल्यावर्षी कोरोना असूनही 16 जुलैला निकाल जाहीर करण्यात आला होता.

पंरतु यंदा राज्य मंडळाने सतरा दिवस उशीरा निकाल जाहीर केला आहे. दरम्यान निकालात अंतर्गत मुल्यमापनाच्या माध्यमातून निकालाचा वाढलेला टक्का आणि नापास होणार्‍या विद्यार्थ्यांचे नगण्य प्रमाण पाहता यंदा बारावीनंतरच्या पदवी प्रवेश प्रक्रियेसाठी मोठी स्पर्धा होणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.

राज्य मंडळाने बारावीचा निकाल अंतर्गत मुल्यमापनाच्या आधारे जाहीर केला आहे. दहावीचा वाढलेला निकालाचा टक्का बारावीच्या निकालासाठी पुरक ठरलेला आहे. त्यामुळे बारावीचा निकाल देखील काही प्रमाणात वाढलेला दिसून येत आहे.
– दिनकर पाटील,अध्यक्ष, राज्य मंडळ

पहा आकडे काय सांगतात…

नोंदणी के लेले नियमित विद्यार्थी – 13 लाख 19 हजार 754
संपादणूक प्राप्त झालेले विद्यार्थी – 13 लाख 19 हजार 754
उत्तीर्ण झालेले नियमित विद्यार्थी – 13 लाख 14 हजार 965
नापास झालेले विद्यार्थी – 4 हजार 791
उत्तीर्ण मुलांचा निकाल – 99.54टक्के
उत्तीर्ण मुलींचा निकाल – 99.73 टक्के
प्रविष्ठ झालेले पुनर्परीक्षार्थी – 66 हजार 871
उत्तीर्ण झालेले पुनर्परीक्षार्थी – 63 हजार63 (94.31 टक्के )
खासगीरीत्या प्रविष्ठ झालेले विद्यार्थी – 26 हजार 332 (99.44 टक्के )
दिव्यांग विद्यार्थ्यांचा निकाल – 99.59 टक्के
शंभर टक्के निकाल लागलेली कनिष्ठ महाविद्यालये – 6 हजार 542
70 विषयांचा निकाल 100 टक्के
निकाल राखून ठेवलेले – 2000
100 टक्के गुण मिळालेले विद्यार्थी – 46
95 टक्क्यांहून अधिक गुण मिळालेले विद्यार्थी – 1 हजार 372
90 टक्यांहून अधिक गुण मिळालेले विद्यार्थी – 91 हजार 420
विशेष प्राविण्यासह 75 टक्यांहून अधिक गुण – 6 लाख 88 हजार 730
प्रथम श्रेणीसह 60 टक्यांहून अधिक गुण -5 लाख 23 हजार 962

विभागीय मंडळनिहाय निकाल

पुणे – 99.75 टक्के
नागपूर – 99.62 टक्के
औरंगाबाद – 99.34 टक्के
मुंबई – 99.79 टक्के
कोल्हापूर – 99.67 टक्के
अमरावती – 99.37 टक्के
नाशिक – 99.61 टक्के
लातूर – 99.65टक्के
कोकण – 99.81 टक्के
एकूण निकाल – 99.63 टक्के

गेल्या तीन वर्षांतील निकाल

2020-99.63 टक्के
2019 – 90.66 टक्के
2018 – 85.18 टक्के

येथे पाहता येणार निकाल

https://hscresult.11thadmission.org.in

https://msbshse.co.in

http://hscresult.mkcl.org

४. http://mahresult.nic.in.    

 

हे पाहा :

महाराष्ट्राचे सर्वात मोठे ऑनलाईन शिक्षण प्रदर्शन आणि वेबिनार मालिका

Back to top button