सिंहगड, राजगड बंदच! सुरू करण्याचे अद्याप आदेश नाहीत | पुढारी

सिंहगड, राजगड बंदच! सुरू करण्याचे अद्याप आदेश नाहीत

वेल्हे : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील सर्व पर्यटनस्थळे सोमवार (दि. २४) पासून सुरू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले आहेत. असे असले तरी सिंहगड, राजगड, तोरणा आदी गडकोट आज (सोमवारी) पर्यटनासाठी खुले झाले नाहीत. गडकिल्ले सुरू करण्याचे आदेश अद्याप मिळाले नाहीत, त्यामुळे गडकोट सुरू करण्यात आले नाही, असे पुरातत्व तसेच वनविभागाने स्पष्ट केले आहे. तसेच गावोगावच्या यात्रा, उत्सवावरही निर्बंध कायम असल्याचे वेल्हेचे तहसीलदार शिवाजी शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.

तोतया कस्टम अधिकारी जाफर इराणीला पुणे पोलिसांकडून बेड्या

दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशामुळे खडकवासला धरणाच्या चौपाटीवर सोमवारी आठवड्याच्या पहिल्या दिवशी पर्यटकांनी गर्दी केली होती. चौपाटीवरील खाद्यपदार्थ विक्री स्टाॅल नव्या दिमाखात सुरू झाले आहेत.

पुणे महापालिका निवडणूक : अजित पवार सक्रिय का झाले नाहीत?

प्रजासत्ताकदिनाची उत्सुकता

बुधवारी प्रजासत्ताकदिन आहे, तोपर्यंत सिंहगड व इतर गडकोट पर्यटकांना खुले करण्यात यावे अशी मागणी शिवभक्त तसेच स्थानिक नागरिकांनी केली आहे. प्रजासत्तादिनाच्या सुट्टीच्या दिवशी हजारोंच्या संख्येने पर्यटक गडकोटांवर गर्दी करतात. त्यामुळे गडकोट खुले होण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे.

गेल्या महिन्यात कोरोनाचा संसर्ग वाढल्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार राष्ट्रीय संरक्षित स्मारके, गडकोट पर्यटकांना बंद करण्यात आली आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी ग्रामीण भागातील पर्यटनस्थळे सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, अद्याप त्याबाबतचा आदेश पुरातत्व विभागाला मिळाला नाही. त्यामुळे गडकोट, संरक्षित स्मारके बंद आहेत. आदेश मिळाल्यानंतर गडकोट खुले करण्यात येणार आहेत.

– विलास वाहणे, सहसंचालक, पुरातत्व विभाग

 

सिंहगड किल्ला पर्यटकांना खुला करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने अद्याप दिले नाहीत. त्यामुळे सिंहगड पर्यटनासाठी सुरू करण्यात आला नाही. याबाबत सुचना मिळाल्यानंतर तातडीने कार्यवाही सुरू केली जाणार आहे.

– प्रदिप साळुंखे, वनपरिक्षेत्र अधिकारी, भांबुर्डे वनविभाग

 

कोरोना संसर्गामुळे गेल्या दोन वर्षांपासून सिंहगड वांरवांर बंद केला जात आहे. आता शहरात बाजारपेठ, रेल्वे स्टेशन आदी ठिकाणी सर्वत्र गर्दी होत आहे. त्यामुळे गडकोट बंद न करता नियमांचे पालन करत सुरू करण्यात यावे. त्यामुळे पर्यटनावर अवलंबून असलेल्या विक्रेते, रहिवाशांवर बेकारीची वेळ येणार नाही.

– विजय मुजुमले, अध्यक्ष, नरवीर तानाजी मालुसरे संस्था

Back to top button