पुणे महापालिका निवडणूक : अजित पवार सक्रिय का झाले नाहीत? | पुढारी

पुणे महापालिका निवडणूक : अजित पवार सक्रिय का झाले नाहीत?

पुणे; पांडुरंग सांडभोर : आगामी महापालिका निवडणुका अगदी तोंडावर येऊनही राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, उपमुख्यमंत्री अजित पवार हे अद्यापही सक्रिय झालेले दिसत नाहीत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस मध्येही मरगळ पसरली असून अशा परिस्थितीत महापालिकेतील सत्ता पुन्हा खेचून आणण्यासाठी त्यांनी लक्ष घालावे अशी मागणी कार्यकर्त्यांमधून केली जात आहे.

महापालिका निवडणुकीसाठीची प्रभाग रचना येत्या आठवडाभरात जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यानंतर साधारण मार्च ते एप्रिलपर्यंत महापालिका निवडणूक होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे आता पालिका निवडणुकीला अगदी एक ते दोन महिन्यांचा कालावधी उरला आहे. असे असतानाही राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात अद्यापही शांतता आहे. त्याचे प्रमुख कारण म्हणजे, महापालिका निवडणुकीची पूर्णपणे मदार ज्यांच्यावर अवलंबून असलेले राष्ट्रवादीचे नेते अजित पवार अद्याप निवडणुकीच्या दृष्टीने शहराच्या राजकारणात सक्रिय झालेले नाहीत. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर पुण्यात राष्ट्रवादीला मोठी ताकद मिळेल अशी आशा कार्यकर्त्यांना होती. मात्र, गेल्या अडीच वर्षातील परिस्थिती पाहता प्रत्यक्षात तसे झालेले दिसत नाही.

गेल्या दोन वर्षात पवार यांनी आत्तापर्यंत एकदाही राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची अथवा कार्यकर्त्यांची एकही बैठक घेतलेली नाही. अथवा शहराच्या पदाधिकाऱ्याचा एकही मोठा मेळावा ही झालेला नाही. केवळ दोन आमदार, खासदार आणि मोजके पदाधिकारी यांच्याच काय ते बैठका पवार यांनी घेतल्या आहेत. पालिका निवडणुकीसाठी पुन्हा एकदा दोन सदस्यांचा प्रभाग होईल असे राष्ट्रवादीच्या इच्छुकांना वाटत होते. मात्र, त्यातही सेनेने घेतलेल्या आग्रही भूमिकेमुळे दोन ऐवजी तीन सदस्यांचा प्रभाग झाला. प्रभाग रचनेंबाबतही संभ्रम आहे. त्यामुळे नगरसेवक आणि कार्यकर्त्यामधील मरगळ अधिकच वाढत चाललेली आहे. अशा परिस्थितीत नगरसेवक आणि कार्यकर्त्यांचे मनोबळ वाढविण्याची गरज आहे.

सद्यस्थितीला शहराध्यक्ष प्रशांत जगताप, खासदार एड वंदना चव्हाण, आमदार चेतन तुपे आणि सुनिल टिंगरे आणि आजी – माजी पदाधिकारी अशी प्रमुख नेते मंडळी शहराची जबाबदारी सांभाळत आहेत. मात्र, यामधील बहुतांश नेते मंडळी आपआपल्या मतदारसंघात आणि प्रभागातच अडकून पडलेली आहेत. त्यामुळे महापालिकेत आता सत्ता आणण्याची असेल तर आता अजित पवारांनीच शहरात सक्रिय व्हावे लागणार आहे. खरतर नुकत्याच झालेल्या नगरपालिका आणि नगर परिषदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीला चांगल यश मिळाले आहे. त्यामुळे हे वातावरण असेच टिकविण्यासाठी महाराष्ट्राप्रमाणे कार्यकर्त्यांना ताकद द्यावी लागेल.

राष्ट्रवादीच्या विरोधात भाजपच्या नेत्यांची फौज

महापालिकेतील निवडणुकीचा खरा सामना हा सत्ताधारी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातच होणार आहे. पालिकेत पुन्हा सत्ता टिकविण्यासाठी भाजपने गेल्या वर्षभरापासून जोरदार मोहीम राबविली आहे. स्वतः विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस पुण्यात लक्ष घालून आहेत. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हेही सर्वाधिक काळ पुण्यात थांबून नगरसेवक आणि इच्छुक यांच्या कार्यक्रमांना उपस्थित राहून त्यांना ताकद देण्याचे काम करीत आहेत. याशिवाय दोन खासदार, सहा आमदार आणि महापालिकेच्या माध्यमातून सर्व पदाधिकारी अशी यंत्रणा सध्या निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. भाजपमधून जे नगरसेवक पुन्हा राष्ट्रवादीत जाण्याच्या तयारीत होते, त्यांनाही विविध प्रकारची आश्वासने देऊन पक्षातच रोखून धरण्यात चांगल्या प्रकारे यशही भाजपने मिळविले आहे. स्वतः फडणवीस यांनी या नागरसेवकांना गोजरण्याचे काम केले आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची एक फेरी होऊन गेली आहे. मेट्रो प्रकल्पाच्या उदघाटनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदीही पुणे दौऱ्यावर येणार आहेत. एकिकडे भाजपची अशी मोठी फौज असतानाच राष्ट्रवादीची सर्व मतदार उपमुख्यमंत्री पवार यांच्यावर अवलंबून आहे. पक्षाचे चेतन तुपे आणि सुनिल टिंगरे हे दोन आमदार शहरात आहेत, मात्र, ते स्वतःच्या मतदारसंघाच्या बाहेर लक्ष घालायला तयार नाहीत ही वस्तुस्थिती आहे.

खासदार सुप्रिया सुळे या ही केवळ बारामती लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या खडकवासला मतदारसंघाच्या पलीकडे शहरात लक्ष घालत नाहीत. स्वतः राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार महापालिका निवडणुकीत किती लक्ष घालणार याबाबत साशंकता आहे. त्यामुळे सद्यस्थितीत महापालिका निवडणुकीची सर्व जबाबदारी अजित पवारांच्या एकट्याच्या खांद्यावर असणार आहे हे स्पष्ट आहे.

Back to top button