पालघर : शेतकऱ्यांना यंदाचा खरीप हंगाम तारणार; ९४ टक्के पावसाचा अंदाज | पुढारी

पालघर : शेतकऱ्यांना यंदाचा खरीप हंगाम तारणार; ९४ टक्के पावसाचा अंदाज

खानिवडे; विश्वनाथ कुडू :  पालघर जिल्ह्यात खरिपापाठोपाठ रब्बी पिकांची लागवड केली जाते. खरिपाचे क्षेत्र हे अधिक आहे. कोरडवाहूसह ओलिताखालील क्षेत्रही अधिक आहे. सध्या एप्रिल महिन्याचे कडक उन्ह डोक्यावर घेऊन शेतकरी खरिपाच्या पूर्वतयारीला लागला आहे. हवामान खात्याने ९४ टक्के पावसाचा अंदाज व्यक्त केल्याने शेतकऱ्यांना यंदाचा खरिप हंगाम तारणार आहे. कुटुंबासह शेतकरी सकाळपासून संध्याकाळपर्यंत शेतात हंगामपूर्व तयारी करीत आहे. शेणखत टाकणे, काट्या वेचने, जमीन भुसभुशीत करणे या कामांना गती देऊ लागला आहे. कृषी विभागही सज्ज झाला आहे. खरीप हंगामात शेतकऱ्यांनी कमी व मध्यम कालावधीचे धानपीक घेण्यासाठी कृषी विभाग प्रोत्साहित करीत आहे

वसई तालुक्यात येत्या खरीप हंगामात १ हजार हेक्टर शेती लागवडीखाली येणार आहे. तालुक्यातील जास्तीत जास्त गावात वनराई बंधारे निर्माण करून त्यामध्ये पावसाळ्यात पडलेले पाणी साठवून ठेवावे व त्या पाण्याच्या साठ्याचा उपयोग संरक्षित ओलितासाठी रब्बी पिकांसाठी करण्याचे निर्देश कृषी विभागाने दिले आहेत. धानपीक लावताना पट्टा पद्धतीचा अवलंब करावा, त्यामुळे तुडतुड्याचे व्यवस्थापन, पिकांचे निरीक्षण व फवारणी करण्यासाठी सोईचे होते, खरीप हंगामात पेरीव पद्धतीत कमी ते मध्यम कालावधीचे धान लागवड केल्यास पावसाचा पिकाला फायदा मिळतो, खरीप हंगामात धानपिकाव्यतिरिक्त पाणी न साचणाऱ्या भागात भाजीपाला पिके जसे मिरची, टमाटर, वांगी, भेंडी, कारले आदी पिके घ्यावीत.

पावसाळी शेतीबरोबरच नकदी उत्पन्न म्हणून उन्हाळी शेती कसण्याकडे शेतकरी सरसावला आहे. अवकाळीने रब्बी हंगाम आटोपता घेण्याकडे बळीराजाचा कल आहे. अवकाळीने नुकसान झाल्याने शेतकरी भरपाईच्या प्रतीक्षेत आहे. कोरोनात रोजगाराचे साधन अपुरे पडू लागल्यानंतर सुशिक्षित तरुणही प्रयोगशील शेतीकडे वळला आहे. मागील वर्षापासून जमिनीचा कस आणि बाजारातील मागणी पाहून शेतकरी पिकं घेऊ लागला आहे. मागील दोन वर्षात भेंडी, गवार व मिरचीला असेला भाव व मोठ्या प्रमाणातातील मागणी लक्षात घेऊन शेतकरी राजा या पिकांच्या लागवडीवर भर देऊ लागला आहे. दरम्यान, अवकाळीच्या तडाख्यानंतर आता उन्हाळी शेती आटोपती घेण्याकडे शेतकरी लागला आहे. जून महिन्यात पावसाचा हंगाम लक्षात घेता एप्रिल महिन्यात शेवटचे पिक काढून त्यानंतर पूर्ण मे महिना मशागतीसाठी शेतकरी वर्ग सज्ज झाला असून शेती कामांची लगबग सुरू झाली आहे.

कृषी विद्यापीठाच्या मार्गदर्शक सूचना

रब्बी पिके निघालेल्या शेतीची त्वरित नांगरणी करावी, त्यामुळे जमीन तापण्यास मदत होऊन किडीचा कोष व घातक बुरशीचा नायनाट होईल. जमीन सुधारणेची कामे प्राधान्याने हाती घ्यावी. शेताबाहेर पाणीमिश्रित माती वाहून जाणार नाही, याची काळजी घ्यावी. पीक नियोजनाप्रमाणे मातीचे नमुने घेऊन तपासणीकरिता विद्यापीठाच्या किंवा शासनाच्या माती परीक्षण शाळेत पाठवावे. स्वच्छता मोहीम हाती घेऊन जास्तीत जास्त कंपोस्ट खड्डे भरावेत, शेतातील काडीकचऱ्यापासून कंपोस्ट खत तयार करावेत. शेतातील खोल मुळ्याची तणे व पालव्या खोदून काढाव्यात. कडुनिंबाच्या निंबोळ्या जास्तीत जास्त गोळा कराव्यात असे आवाहन शेतकऱ्यांना करण्यात आले आहे.

Back to top button