पालघर : वाडा तालुक्यातील ग्रामीण भागात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट | पुढारी

पालघर : वाडा तालुक्यातील ग्रामीण भागात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट

वाडा; पुढारी वृत्तसेवा :  पालघर जिल्ह्यातील आदिवासी भागात आरोग्य यंत्रणेचा बोजवारा उडला असून मोखाडा व वाडा तालुक्यातील दोन घटनांनी आरोग्य व्यवस्थेचे जणू विच्छेदन केले आहे. असे असताना वाडा तालुक्यातील ग्रामीण भागात बोगस डॉक्टरांनी उच्छाद मांडला असून गोरगरिबांच्या जीवाशी खेळणार्‍या या भोंदूगिरीवर कुणी कारवाई करणार आहे का, असा सवाल विचारला जात आहे. एकीकडे कुचकामी आरोग्य यंत्रणेमुळे गरिबांना चटके सोसावे लागत असून दुसरीकडे बोगस डॉक्टरांच्या कचाट्यात उपचार घेऊन लोकांना जीव धोक्यात घालावा लागत आहे हे दुर्दैवी आहे.

तालुक्यांतील वरसाले गावात शासकीय सेवेतील वैद्यकीय अधिकार्‍याचा खासगी दवाखाना असून यात असलेली परिचारिका
डॉक्टरांशी फोनवर बातचीत करून ऑनलाईन पद्धतीने रुग्णांवर उपचार करते. दुसरीकडे याच भागात उज्जैनी जवळ भोकरपाडा गावात एक बोगस डॉक्टर राजरोसपणे दवाखाना उघडुन लोकांवर उपचार करतो ज्याच्या पदव्या बोगस असल्याचे खुद्द तालुका वैद्यकीय अधिकारी सांगतात.

तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ. संजय बुरपल्ले यांनी भोकरपाडा येथील दवाखान्यांना भेट दिली होती. मात्र असे असतानाही हे धोकादायक दवाखाने लोकांच्या जीवाशी खेळ करीत आहेत. वरसाले येथील डॉक्टर कंत्राटी मात्र शासकीय सेवेत कार्यरत असून ते सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेनंतर खासगी सेवा देऊ शकतात असे ग्रामीण रुग्णालयाचे अधिक्षक डॉ. सुनिल भडांगे यांनी सांगितले. मात्र हेच डॉक्टर दिवसभर ऑनलाईन पद्धतीने उपचार करून शासकीय सेवेला एकप्रकारे हरताळ फासतात, असा आरोप केला जात असून याबाबत सखोल चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

या भागात मी प्रत्यक्ष भेट दिली असून भोकरपाडा येथील दवाखाना बोगस
डॉक्टर चालवत आहे . याबाबत निश्चितच कारवाई केली जाईल.
– डॉ. संजय बुरपल्ले, तालुका आरोग्य अधिकारी

Back to top button