डोंबिवलीत 272 किलो गांजा बाळगणार्‍यांना अटक | पुढारी

डोंबिवलीत 272 किलो गांजा बाळगणार्‍यांना अटक

डोंबिवली : पुढारी वृत्तसेवा : तरुणाईला अमलीपदार्थांच्या व्यसनात अडकवून त्यांचे जीवनमान बरबादीच्या खाईत लोटण्याचा प्रयत्न करणार्‍या दोन तस्करांना मानपाडा पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी फिल्मी स्टाईलने थरारक पाठलाग करून डोंबिवली आणि आसपासच्या भागात वितरणासाठी आणलेला 272 किलो गांज्यासह इनोवा कार, 8 मोबाईल असा 47 लाख 76 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. फैसल फारूख ठाकूर (21, रा. माझगाव, मुंबई) आणि मोहम्मद आतीफ हाफीज उल्ला अन्सारी (32, वर्षे रा. गैबीनगर, भिवंडी) अशी तस्करांची नावे आहेत.

डोंबिवलीजवळच्या ग्रामीण भागात अवैध गांजाविक्री होत असल्याची माहिती मानपाडा पोलीस पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल भिसे आणि त्यांच्या पथकाने शुक्रवारी उंबार्ली गावाच्या हद्दीत फिल्डींग लावली होती. गावाबाहेर असलेल्या मोकळ्या रानमाळावर गांजा विक्रीसाठी दोन तस्कर कारमधून येणार असल्याने या पथकाने त्यांना पकडण्यासाठी जय्यत तयारी केली होती. इतक्यात एक इन्होव्हा कार संशयास्पदरित्या येऊन थांबताच पोलिसांनी या कारवर झडप घालण्याचा प्रयत्न केला. मात्र चालकाने कार तेथून भरधाव वेगात दांबटली. मात्र पोलिसांनी थरारक पाठलाग करत या कारला मोठ्या धाडसाने थांबवले. कारमध्ये असलेल्या इसमांसह कारची तपासणी केली असता, त्यात 272 किलो वजनाचा गांजा वेगवेगळ्या प्लास्टीकच्या पिशव्यांमध्ये आढळून आला. हा गांजा येथूनच कल्याण-डोंबिवलीच्या विविध भागांत विक्रीसाठी वितरीत करण्यात येणार असल्याची कबुली दोन्ही तस्करांनी पोलिसांजवळ दिली.

ओडिशाचे कल्याण-डोंबिवली कनेक्शन कापले

तस्करांनी मुंबई, ठाणे नवी मुंबईसह कल्याण-डोंबिवली पट्ट्यात चोरीछुपे गांजा विक्रीचा गोरखधंदा करणार्‍या तस्करांना विक्री करत असल्याचे तपासात आढळून आले आहे. विशेष म्हणजे इतका मोठा गांजाचा साठा ओडिसाहून डोंबिवलीत आणला असावा, असा पोलिसांचा कयास आहे. यापूर्वीही धुळ्यातील जंगलात गांजा पिकवणार्‍या व खरेदी करून तो कल्याण-डोंबिवलीतील विद्यार्थ्यांना पुरवणार्‍या टोळीचा कणा मोडून काढला होता.

Back to top button