Nashik Police : अभिप्राय, सूचनांसाठी नाशिक पोलिसांकडून व्हॉट्सअप क्रमांक | पुढारी

Nashik Police : अभिप्राय, सूचनांसाठी नाशिक पोलिसांकडून व्हॉट्सअप क्रमांक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- शहरात नागरिकस्नेही पोलिसिंगवर भर देण्यासाठी सोशल मीडियाचा वापर सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी ‘एक्स’ माध्यमातून नागरिकांना शहरातील कारवाई, घडामोडींची माहिती देण्यास सुरुवात केली आहे. तसेच नागरिकांकडून अभिप्राय, सूचना मागवण्यासाठी शहर पोलिसांनी ९९२३३२३३११ हा व्हॉट्सअप क्रमांक सुरू केला आहे. (Nashik Police)

कर्णिक यांनी नाशिक पोलिस आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून नागरिककेंद्रित पोलिसिंगवर भर दिला आहे. त्यानुसार नाशिक पोलिसांच्या ‘एक्स हँडल’वर नागरिकांनी केलेल्या तक्रारींना त्वरित प्रतिसाद दिला जात आहे. तसेच शहर पोलिसांच्या कारवाईची माहितीही सांगितली जात असल्याने नागरिकांना पोलिसांच्या कार्यप्रणालीची माहिती मिळत आहे. शहर पोलिसांच्या एक्स हँडलवर ४९ हजार फॉलोअर्स आहेत. मात्र, अनेक नागरिक ‘एक्स’ वापरत नसल्याने त्यांच्या सुविधेकरिता व्हॉट्सॲपच्या माध्यमातून तक्रार नोंदवून त्यावर कारवाईचे अपडेट मिळविण्याची सुविधा सुरू करण्यात आली आहे. पोलिसांच्या व्हॉटसॲप क्रमांकावर केवळ सूचना व अभिप्राय नोंदवावेत, असे आवाहन शहर पोलिसांनी केले आहे. त्यानुसार बुधवारी (दि.२७) दुपारी अडीचपर्यंत ९० सूचना, अभिप्राय व्हॉटसॲप क्रमांकावर नोंदवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. यात वाहतुकीसंदर्भातील समस्या, तक्रारी व सूचना अधिक होत्या.

डायल ११२ वरून मदत (Nashik Police)

नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीत मदत हवी असल्यास त्यांनी ११२ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. तर व्हॉट्सअपवर नागरिकांनी केवळ त्यांचे अभिप्राय, सूचना नोंदवाव्यात. जेणेकरून पोलिसांना नागरिकांशी संपर्कात राहणे शक्य होईल.

हेही वाचा :

Back to top button