नाशिक : खंडित वीज पुरवठ्यामुळे अंबडचे उद्योजक आक्रमक | पुढारी

नाशिक : खंडित वीज पुरवठ्यामुळे अंबडचे उद्योजक आक्रमक

सिडको, पुढारी वृत्तसेवा : अंबड औद्योगिक वसाहतीत गुरुवारी (दि.२२) दीर्घकाळ वीजपुरवठा खंडित राहिला त्यानंतरही विजेचा लपंडाव सुरुच होता. यामुळे संतप्त झालेल्या उद्योजकांनी आ.य.मा अध्यक्ष निखिल पांचाळ यांच्या नेतृत्वाखाली १३२ केवी उपकेंद्र गाठले. मात्र, तेथे कुणीच जबाबदार अधिकारी नसल्याने आणि उपस्थित कर्मचाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने उद्योजकांनी पायऱ्यांवरच ठिय्या मांडून आपला निषेध नोंदवला. त्यानंतर आलेल्या अधिकाऱ्यांनी उद्योजकांची समजूत काढल्यानंतर ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले. मात्र, वीज पुरवठ्याचा सावळा गोंधळास जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांची त्वरित हकालपट्टी करावी या मागणीवर उद्योजक ठाम राहिल्याने त्यांच्यावर निश्चितच कारवाई केली जाईल, असे आश्वासन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर उद्योजकांनी आंदोलन मागे घेतले.

उद्योजक हा देशाच्या विकासाचा कणा आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर उद्योजकांना आपापल्या मालाच्या उत्पादनांच्या ऑर्डर पूर्ण करावयाच्य असल्याने उद्योजकांची त्यासाठी एकच धावपळ सुरु आहे. त्यासाठी त्यांना अखंड वीज पुरवठा हवा असतो. परंतु, वीज मंडळाच्या आणि विशेषतः महावितरणच्या अधिकाऱ्यांच्या गलथानपणामुळे गेल्या आठवड्यात सातत्याने वीज पुरवठा खंडित राहिला होता. उद्योजकांचे त्यामुळे अतोनात नुकसान झाले.

खंडित वीज पुरवठ्यामुळे उद्योजकांचे तीनशे कोटी रुपयांचे नुकसान झाले असून ही निश्चितच गंभीर बाब आहे. शुक्रवारी सकाळी आम्ही उपकेंद्राला भेट दिली असता तेथे एकही अधिकारी हजर आढळला नाही हे तर आश्चर्यच म्हणावे लागेल. या संपूर्ण प्रकरणाची सर्वंकष चौकशी झाली पाहिजे.

 निखिल पांचाळ, अध्यक्ष- अंबड इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन

हेही वाचलंत का?

 

Back to top button