जळगाव : आमदार सावकारे यांचे हातावर 'घड्याळ' बांधण्याचे संकेत | पुढारी

जळगाव : आमदार सावकारे यांचे हातावर 'घड्याळ' बांधण्याचे संकेत

जळगाव ; पुढारी वृत्‍तसेवा

भुसावळ तालुक्याचे भाजपचे आमदार संजय सावकारे हे लवकरच कमळाला रामराम करून हातावर घड्याळ बांधण्याचे संकेत कार्यकर्त्यांमार्फत मिळू लागले आहेत. याला पुष्टी म्हणून जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत भाजपाच्या सर्व उमेदवारांनी उमेदवारी मागे घेतल्यावर ही भुसावळ तालुक्याचे आमदार संजय सावकारे यांनी आपली उमेदवारी मागे घेतली नव्हती.

शुभेच्छा फलकावर भाजपमधील राज्याचे नेते गायब

आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त पंचायत समिती भुसावळ येथे लावण्यात आलेल्या शुभेच्छा फलकावर भाजपाचे जिल्ह्याचे नव्हे तर राज्याचे नेते देखील गायब झाले असून, त्या ठिकाणी राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांचे छायाचित्र  आहे. शुभेच्छा देणारे भाजपाचे तालुकाध्यक्षांसह सभापती उपसभापती पंचायत समिती सदस्य आहेत.

बॅनरच्या माध्यमातून सावकारे स्वगृही परतण्याचे संकेत

भुसावळ आमदार संजय सावकारे यांचे समर्थक व राष्ट्रवादीने नेते एकनाथराव खडसे यांचे समर्थक यांनी आज आमदार संजय सावकारेंच्या वाढदिवसानिमित्त लावण्यात आलेल्या बॅनरच्या माध्यमातून संजय सावकारे लवकरच स्वगृही म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये परत येणार याचे संकेत दिले आहेत.

सावकारेंच्या वाढदिवसानिमित्त भुसावळ पंचायत समिती कार्यालयाच्या बाहेर लावण्यात आलेल्या बॅनरवर भाजपच्या एकही वरिष्ठ नेत्यांचे फोटो नाही, मात्र त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते एकनाथराव खडसे यांचा फोटो लावण्यात आला. याला पुष्टी म्हणून नुकत्याच झालेल्या जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत भाजपाने माघार घेतली.

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत सावकारेंचा अर्ज माघारी नाही

भुसावळ तालुक्याचे आमदार संजय सावकारे यांनी आपला अर्ज माघारी घेतला नाही. ते यात विजयी सुद्धा झाले सावकार यांना राष्ट्रवादी काँग्रेस मधून भाजपमध्ये आणण्‍यासाठी सर्वात महत्त्वाचा रोल हा एकनाथराव खडसे यांचा होता. खडसे यांनी भाजपाला राम राम करून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे, मात्र पक्षांतर्गत कायद्यामुळे खडसे समर्थकांना अडचण येत असल्याने प्रवेशावेळी समर्थकांच्या घरातल्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.

भुसावळ तालुक्यामध्ये भुसावळ नगरपालिका, पंचायत समिती, आमदार हे जरी सध्या भाजपात असले तरी ते खडसे समर्थक आहेत हे वेळोवेळी दिसून आले आहे. त्यामुळे आज आमदार सावकारे यांच्या वाढदिवसानिमित्त लावण्यात आलेल्या फलकावर शुभेच्छुक असलेले भुसावळ तालुक्याचे भाजप तालुका अध्यक्ष भालचंद्र पाटील, पंचायत समिती वंदना उन्हाळे, उपसभापती प्रीती मुरलीधर पाटील,

पंचायत समिती सदस्य मनीषा भालचंद्र पाटील, जिल्हा परिषद सदस्य पल्लवी सावकारे, माजी सभापती गोलू पाटील या पदाधिकाऱ्यांनी भाजपत असूनही बॅनरवर खडसेंचा फोटो लावून आपण खडसे समर्थक असल्याचे दाखवून दिले आहे. समर्थक खडसेंचे असल्यामुळे सावकारेही लवकर स्वगृही परतणार याचे संकेत त्यांनी या बॅनरच्या माध्यमातून  दिले आहेत.

हेही वाचलं का? 

Back to top button