जळगाव : शतपावली करताना छतावरून पडून अभियंत्‍याचा मृत्‍यू, मोबाईलवर बोलताना घडली घटना | पुढारी

जळगाव : शतपावली करताना छतावरून पडून अभियंत्‍याचा मृत्‍यू, मोबाईलवर बोलताना घडली घटना

जळगाव; पुढारी वृत्‍तसेवा

शहरातील जिल्हापेठ परिसरातील उदय कॉलनी परिसरात सेवानिवृत्त अभियंता घराच्या छतावर शतपावली करत असताना तोल जावून पडल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली. या प्रकरणी जिल्हापेठ पोलिस स्‍टेशनमध्ये या घटनेची अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जिल्हापेठ परिसरात असलेल्या उदय कॉलनी येथे सेवानिवृत्त उपकार्यकारी अभियंता संजीव भास्कर पाटील (वय ६०) हे आपल्‍या कुटुंबीयांसह राहतात. शुक्रवार १० डिसेंबर रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास ते जेवण करून आपल्‍या दुमजली घराच्या छतावर शतपावली करण्यासाठी गेले. ते मोबाईलवर बोलत असताना शतपावली करत होते.

यावेळी अचानक त्‍यांचा तोल गेल्याने ते घरावरून खाली पडले. त्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल केले. यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता, त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन विवाहित मुली, एक मुलगा, जावई, नातवंडे असा परिवार आहे. या प्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा तपास जिल्हापेठ पोलिस करीत आहेत.

Back to top button