#Omicron : राज्यातील ओमायक्रॉन रुग्णसंख्या १७ वर, मुंबईत जमावबंदीचे आदेश | पुढारी

#Omicron : राज्यातील ओमायक्रॉन रुग्णसंख्या १७ वर, मुंबईत जमावबंदीचे आदेश

पुढारी ऑनलाईन डेस्क

#Omicron cases in Maharashtra : राज्यात शुक्रवारी ओमायक्रॉनचे आणखी ७ रुग्ण आढळले. या नव्या रुग्णांमध्ये मुंबईतील ३ तर पिंपरी- चिंचवडमधील ४ रुग्णांचा समावेश आहे. कोरोनामुक्त झालेल्या धारावीत ओमायक्रॉनने शिरकाव केल्याने मुंबई महापालिका सतर्क झाली आहे. दरम्यान, राज्यात ओमायक्रॉनच्या धास्तीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत ११ आणि १२ डिसेंबर रोजी कलम १४४ लागू करण्यात आले आहे. यामुळे वाहनांच्या रॅली, मोर्चे आणि मिरवणुकांना (Rallies/morchas/processions) मनाई करण्यात आली आहे.

राज्यात आतापर्यंत ओमायक्रॉनचे १७ रुग्ण आढळून आले आहेत. मुंबईत आढळून आलेल्या रुग्णांमध्ये ४८, २५ आणि ३७ वर्षांचे पुरुष आहेत. धारावीत इंदिरानगर येथील एका मशिदीमध्ये टांझानियाहून आल्यापासून हा रुग्ण संशयित होता. त्याला ओमायक्रॉन झाल्याचे स्पष्ट झाले आहे. १ डिसेंबरला लंडन येथून आलेल्या एका २५ वर्षीय पुरुषाची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्याचा वैद्यकीय नमुना जनुकीय विश्लेषणासाठी पाठविण्यात आला होता. या रुग्णाने लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत.

दक्षिण आफ्रिकेतून ४ डिसेंबर रोजी आलेल्या गुजरातचा रहिवासी असलेल्या एक ३७ वर्षीय रुग्ण कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यालाही ओमायक्रॉनचा (#Omicron) संसर्ग झाल्याचा अहवाल शुक्रवारी आला.

दरम्यान, शनिवारी केंद्र सरकारच्या वतीने ओमायक्रॉन स्ट्रेन, लसीकरण आणि सद्य:स्थितीबाबत आढावा घेण्यात येणार आहे. अलीकडे आयसीएमआरच्या शास्त्रज्ञांच्या चमूने केलेल्या अभ्यासात कोव्हिशिल्ड लस डेल्टा डेरिव्हेटिव्हजच्या विरुद्ध परिणामकारक ठरत असल्याचे निदर्शनास आले आहे. ते लक्षात घेऊन कोव्हिशिल्ड लसीचा बूस्टर डोस म्हणून वापरण्याची सूचनाही आयसीएमआरने केली आहे.

भारतातील ओमायक्रॉन प्रसाराबाबत ‘आयसीएमआर’चे प्रमुख डॉ. बलराम भार्गव यांनी या ओमायक्रॉन व्हेरियंटसंदर्भात घाबरून जाण्याची गरज नाही. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर कसलाही ताण पडलेला नाही, असे स्पष्ट केले. नव्या व्हेरियंटसंदर्भात सध्याची उपचारपद्धती योग्य आहे. मात्र, या व्हेरियंटसंदर्भात वैज्ञानिकद‍ृष्ट्या अभ्यास सुरू असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : Omicron Corona जाणून घ्या सर्व माहिती? डॉ. रमण गंगाखेडकर | All you need to know about Omicron Corona

Back to top button