Maharashtra MLC Election | ‘शिक्षक’च्या आखाड्यात पुन्हा घराणेशाही? या घराण्यांची चर्चा | पुढारी

Maharashtra MLC Election | 'शिक्षक'च्या आखाड्यात पुन्हा घराणेशाही? या घराण्यांची चर्चा

नाशिक : वैभव कातकाडे

नाशिक विभागाच्या शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत विभागातील राजकीय घराणेशाही उफाळून येण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामध्ये अहमदनगरमधील विखे घराण्यातील डॉ. राजेंद्र विखे, कोल्हे कुटुंबातील विवेक कोल्हे, विद्यमान आमदार किशोर दराडे, माजीमंत्री हिरे यांच्या घरातील डाॅ. अपुर्व हिरे, गुळवे घरातील संदीप गुळवे यांची नावे चर्चेत असल्याने या निवडणुकीला रंगत येणार आहे.

शिक्षक मतदारसंघाच्या आमदारांचा कार्यकाळ येत्या जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात संपत आहे. त्यामुळे निवडणूक आयोग कोणत्याही क्षणी निवडणुकीची घोषणा करण्याची शक्यता आहे. यापुर्वी १० जूून रोजी निवडणूक आणि १३ जून रोजी मतमोजणी असा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला होता. मात्र, शिक्षक संघटनांनी उच्च न्यायालयात धाव घेत ही निवडणूक १५ जूननंतर घेण्याची मागणी केली होती. आयोगाने निवडणुकीच्या तारखेत बदल करण्याबाबत आश्वस्त करत तुर्तास निवडणूक पुढे ढकलली आहे.

दरम्यान, नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक मतदार आहेत. त्याखालोखाल नगर, जळगाव, धुळे आणि नंदुरबार यांचा क्रमांक लागतो. जळगाव, धुळे व नंदुरबार हे तिनही जिल्हे मिळून जेवढी मतदारसंख्या आहे, तेवढी एकट्या नाशिक जिल्ह्यातील मतदारांची आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातून इच्छुक जास्त राहिल्यास मतविभागणी होऊ शकते. शिक्षक संघटनांसह इच्छुकांच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. मागील निवडणुकीत झालेल्या फाटाफुटीमुळे यंदा ‘टीडीएफ’नेही तयारी चालवली असून, शिक्षक उमेदवाराला प्राधान्यक्रम देण्याचे निश्चित केले असल्याचे समोर आले आहे.

शिवसेनेच्या ठाकरे गटाचे आमदार किशोर दराडे हे वर्षभरापासून पुन्हा एकदा निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहेत. त्यासोबतच नाशिकमधून मविप्रचे संचालक संदीप गुळवे यांनी देखिल जोरदार तयारी केली आहे. महात्मा गांधी विद्यामंदीरचे संचालक अपुर्व हिरे यांनी देखिल जोर लावला आहे. यामध्ये अहमदनगरमधील दोन राजकीय वारसा असलेल्या घराण्यांनी उमेदवार असल्याचे दाखवत कामाला सुरुवात केली आहे. यामध्ये प्रवरा अभिमत विद्यापिठाचे सर्वेसर्वा तथा महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे बंधू डॉ राजेंद्र यांचे नाव भाजपकडून येत आहे तर कोपरगावच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे चिरंजीव विवेक कोल्हे हे देखिल भाजपकडून प्रयत्नात आहेत.

तब्बल ९३ टक्के मतदान

शिक्षक मतदारसंघामध्ये नाशिक विभागातील ग्रामीण व शहरी मिळून ५५ आमदार व ५ खासदारांचे कार्यक्षेत्र आहे तसेच ५२ तालुक्यांनी हा मतदारसंघ व्यापलेला आहे. गेल्या निवडणूकीत दराडे यांनी शिवसेना पुरस्कृत उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे संदीप बेडसे यांचा २४ हजार ३६९ मतांनी पराभव केला होता. भाजपचे अनिकेत पाटील हे तिसऱ्या क्रमांकावर राहिले होते. त्यावेळी सुमारे ५३ हजार मतदारांनी नोंदणी केली होती, तर ९२.३० टक्के मतदान झाले होते.

हेही वाचा –

Back to top button