का झाला ‘नीट’चा घोळ? | पुढारी

का झाला ‘नीट’चा घोळ?

हरीश बुटले

‘नीट’ परीक्षेच्या निकालावरून देशभरात मोठे वादळ निर्माण झाले आहे. पेपरफुटीमुळे मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांना मार्क्स मिळाले की काय, याची चर्चा होऊ लागली आहे. निकालातील ही हेराफेरी लक्षात येऊ नये म्हणून लोकसभेचा निकाल लागण्याच्या दिवशीच संध्याकाळी हा निकाल जाहीर करण्यात आला, असे म्हटले जाते. या प्रकरणात न्यायालयाला हस्तक्षेप करावा लागला आहे.

पाच मे रोजी झालेल्या ‘नीट’ परीक्षेचा निकाल चार जूनला लोकसभा निवडणूक निकालांच्या रणधुमाळीमध्येच जाहीर झाला आणि देशात एक मोठे वादळ निर्माण झाले. दरवर्षी साधारणत: परीक्षा झाल्यापासून 40 दिवसांमध्ये निकाल जाहीर होतो. यंदा तो 14 जून रोजी जाहीर होणार होता; मात्र दहा दिवस अगोदरच तो जाहीर करण्यात आला. यावेळच्या निकालामध्ये फारच विस्मयकारक असे प्रकार घडल्याचे दिसून आले. निकाल यादीत 720 पैकी 720 गुण घेणारे एकूण 67 विद्यार्थी दिसले. ‘न भूतो न भविष्यती’ असा हा ‘रेकॉर्डब्रेक टॉपर’चा निकाल ठरला. मात्र, निकालात 718 आणि 719 गुण मिळवणारे विद्यार्थीदेखील दिसल्यावर या क्षेत्रातील जाणकारांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली आणि या संपूर्ण निकालाचा भांडाफोड झाला. त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे, 718 किंवा 719 गुण हे या ‘नीट’च्या परीक्षांमध्ये कधीही मिळू शकतच नाहीत. या परीक्षेमध्ये ‘निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम’ असते. एक प्रश्न चुकला की, चारसह एक गुण असे पाच गुण वजा होतात किंवा विद्यार्थ्याने स्मार्टपणे तो प्रश्नच सोडवला नाही, तर त्याला चार गुण कमी पडतात. म्हणजे 720 च्या पूर्वी एक तर 716 किंवा 715 गुण असलेला विद्यार्थी असू शकतो. मात्र, गुणवत्ता यादीत 718 आणि 719 चे विद्यार्थी दिसल्याने गदारोळ उठला. त्यानंतर ‘नीट’ने सांगितले की, आम्ही काही विद्यार्थ्यांना ‘ग्रेस’ गुण दिले. कारण, त्या विद्यार्थ्यांना परीक्षेचा पेपर उशिराने दिलेला होता, त्यांच्या वेळेच्या झालेल्या अपव्ययाच्या प्रमाणात आणि त्यांच्या एकंदरीतच उत्तर सोडवण्याच्या क्षमतेनुसार हे गुण बहाल करण्यात आले. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर 720 गुण घेणारे विद्यार्थी निर्माण झाले. त्याचबरोबर केवळ 720 च नव्हे, तर 700 पेक्षा जास्त गुण घेणार्‍या विद्यार्थ्यांचा आकडा बघून सर्वांचे डोळे विस्मयचकित झाले. त्यानंतर प्रेस रीलिजमध्ये ‘नीट’ने जाहीर केले की, ज्या विद्यार्थ्यांनी वेळेविषयीची तक्रार हायकोर्टात केली त्या 1,563 विद्यार्थ्यांना असे गुण बहाल करण्यात आले. त्याचबरोबर एक प्रकार असा लक्षात आला की, गुणवत्ता यादीतील सहा विद्यार्थी एकाच केंद्रावरून 720 गुण घेते झाले. त्यांचे फॉर्म क्रमांक जवळचे होते. त्यांच्या नावांमध्ये केवळ विद्यार्थ्यांचे नाव होते, त्यांच्या आई-वडिलांच्या नावाचा कोणताही उल्लेख नव्हता, त्यामुळे आणखी शंकेला बळ मिळाले.

संबंधित बातम्या

‘नीट’च्या निकालाच्या गोंधळामुळे समाजमाध्यमांत संपूर्ण देशव्यापी मोठी खळबळ माजली. त्यात भर म्हणजे, याच परीक्षेच्या संदर्भात 4 मे रोजी परीक्षेच्या एक दिवस आधी फुटलेला पेपर समाजमाध्यमांवर आधीच व्हायरल झाला होता. कदाचित पेपरफुटीमुळे एवढ्या मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांना मार्क्स मिळाले की काय, याचीही चर्चा होऊ लागली. या पेपरफुटीसंदर्भात बिहारमध्ये ‘एफआयआर’देखील दाखल झाला. त्याची चौकशी सुरू आहे. एव्हाना समाजमाध्यमांतील चर्चेबरोबरच देश पातळीवरील मोठ्या कोचिंग क्लासेसचे संचालक आपापल्या विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे राहण्यासाठी मोठमोठ्या वाहिन्यांवरून आपापल्या पद्धतीने विश्लेषण करत आहेत.

या संपूर्ण प्रकारातले काही वास्तव मुद्दे खालीलप्रमाणे…

1) 2024 मध्ये 2023 च्या तुलनेमध्ये मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी प्रविष्ट झाले (2023 – 20,38,596; 2024 – 23,33,297).
2) नीट परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांच्या बारावीच्या वर्षात साधारणपणे 22 ते 25 टक्के अभ्यासक्रम कमी करण्यात आला. त्याला कोटामध्ये मोठ्या प्रमाणावर होणार्‍या आत्महत्यांची पार्श्वभूमी होती. विद्यार्थ्यांवर असणारे अभ्यासाचे ओझे कमी करण्यासाठी म्हणून कदाचित हा निर्णय घेण्यात आला असावा. मात्र, त्यामुळे मेरिट मोठ्या प्रमाणावर वाढले.
3) देशपातळीवर 571 शहरांतून ही परीक्षा 4,750 केंद्रांवर संपन्न झाली. तुलनेने पेपर सोपा होता, असे अनेक जाणकारांचे म्हणणे होते.
4) सवाई माधोपूरमधील एका केंद्रावर पेपर वाटण्याच्या संदर्भामध्ये जो उशीर झाला, त्यामुळे त्या विद्यार्थ्यांना 2018 च्या ‘नीट’ परीक्षेवेळी सुप्रीम कोर्टाने जे निर्देश दिलेले होते त्याप्रमाणे वेळेचा अपव्यय झाल्याच्या पोटी जादा गुण देण्यात आले. तसे कोणतेही निर्देश आणि कोणतीही तरतूद ‘एनटीए’च्या प्रोस्पेक्टस्मध्ये केलेली नव्हती. त्याचबरोबर ‘क्लॅट’ची परीक्षा ऑनलाईन होती आणि ‘नीट’ ही परीक्षा ऑफलाईन. ‘क्लॅट’मध्ये सर्व रिस्पॉन्सेस ट्रॅक करणे शक्य होते. मात्र, ऑफलाईन परीक्षा असल्याने केवळ सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे विद्यार्थ्यांना देण्यात येणारे वाढीव गुण हे देण्याचा निर्णय अनाकलनीय होता.
5) 720 गुण मिळवणार्‍या 67 विद्यार्थ्यांपैकी 44 विद्यार्थ्यांना फिजिक्सच्या एका प्रश्नाला दोन पर्याय बरोबर असल्याने गुण देण्यात आले, तर सहा विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क मिळाल्यामुळे 720 गुण मिळालेत. जे ग्रेस मार्क दिले होते त्या ग्रेस मार्कांमुळे विद्यार्थ्यांचे गुण 20 ते 720 पर्यंत झाले, असे ‘एनटीए’ने जाहीर केले. 17 विद्यार्थ्यांना निव्वळ 720 मार्क मिळाले. 2024 मध्ये हा एक मोठा मेरिटचा बूस्ट होता; कारण यापूर्वी एका वर्षामध्ये दोन किंवा फार तर तीन विद्यार्थी पैकीच्या पैकी म्हणजे 720 गुण मिळवत होते.

6) 2024 मध्ये गुणांची वाढलेली एकूण सरासरी ही थक्क करणारी होती. 2023 मध्ये सर्व विद्यार्थ्यांच्या गुणांची सरासरी काढली असता 720 पैकी 279.41 एवढी होती, तर 2024 मध्ये ती चक्क 323.55 एवढी झाली. म्हणजे सरासरी मार्कांमध्ये जवळपास 44.14 टक्क्यांची वाढ झाली आणि खुल्या वर्गासाठी मागील वर्षी असलेले 137 पात्रता गुण 164 गुणांवर गेले. त्यामुळे सकृतदर्शनी मोठ्या प्रमाणावर गुणांमध्ये वाढ झालेली आहे, हे स्पष्ट दिसून येत होते. मात्र, हा फुगवटा एवढ्या मोठ्या प्रमाणावर होता की, त्यात काही गौडबंगाल आहे, अशी शंका घेण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर वाव निर्माण झाला.

निकालातील ही हेराफेरी लक्षात येऊ नये म्हणून कदाचित लोकसभेचा निकाल लागण्याच्या दिवशीच संध्याकाळी हा निकाल जाहीर करण्यात आला, असे अनेकांना साहजिकच वाटू लागले. त्यामुळे आणखी मोठ्या प्रमाणावर शंका वाढली आणि त्याची परिणीती ‘एनटीए’च्या विरोधात खूप मोठ्या प्रमाणावर रोष निर्माण होण्यात झाली.

दरम्यानच्या काळात ‘एनटीए’ने एक प्रेस रीलिज करत निकालाविषयी ज्या शंका निर्माण केल्या होत्या त्या पाच मुद्द्यांवर खुलासा केला. त्यात कटऑफ का वाढले? ग्रेस मार्क का व किती विद्यार्थ्यांना दिले? टॉपर्सचे देशपातळीवर डिस्ट्रिब्युशन कसे होते? चार तारखेला निकाल लावण्याची त्यांची भूमिका आणि संपूर्ण परीक्षेत कोणताही गैरप्रकार झाला नाही यासंदर्भातील सर्व खुलासा त्यांनी केला. मात्र, हा खुलासा विद्यार्थी व पालकांना फारसा रुचला नाही, उलटपक्षी त्यांचा रोष आणखी वाढला.

तो रोष कमी व्हावा, यासाठी परत एकदा ‘एनटीए’ने जरी केलेल्या ‘एफएक्यू’च्या माध्यमातून जेवढ्या शंका होत्या त्या दूर करण्याचा प्रयत्न केला. त्यात त्यांनी सांगितले की, 100 विद्यार्थी 89 वेगवेगळ्या केंद्रांचे असून, 55 शहरांतून त्यांनी परीक्षा दिली आणि 17 वेगवेगळ्या राज्यांचे व केंद्रशासित प्रदेशांचे आहेत. त्यापैकी 73 सीबीएससी बोर्डाचे आणि 27 त्या त्या राज्यांच्या बोर्डाचे आहेत. त्यात त्यांनी सवाई माधोपूर या केंद्रावर घडलेल्या प्रकाराबद्दल खुलासा केला आणि परीक्षेत कोणताही गैरप्रकार झाला नाही, असे स्पष्ट सांगितले. वृत्तवाहिन्यांच्या

Back to top button