पर्यावरणाचा ऱ्हास थांबवायचा तर शिवरायांचे आज्ञापत्र हाच पर्याय : दुर्ग व जलअभ्यासक राम खुर्दळ | पुढारी

पर्यावरणाचा ऱ्हास थांबवायचा तर शिवरायांचे आज्ञापत्र हाच पर्याय : दुर्ग व जलअभ्यासक राम खुर्दळ

नाशिक : नैसर्गिक संसाधने आपली शास्वत संपत्ती आहे, तिच्या ऱ्हासाला स्वार्थी व विकृत मानव कारणीभूत आहे. वाढलेला वनवा, लाकूडतोड, पाण्याचा अपरिमित वापर, उपसा, डोंगर नैसर्गिक टेकड्यांचे अपरिमित उत्खनन, नद्या उपनदयांचे हरवलेले अस्तित्व, जैव विविधतेचा (वन्यजीव पक्षी) होणारा ऱ्हास, तसेच घाट माथ्यांचे ओसाड होणे, उभ्या झाडांवर चालणाऱ्या कुऱ्हाडी यामुळे नैसर्गिक ऋतूचक्र त्याच समतोल हरवून बसले आहे. तापमनात झालेली वाढ, अवकाळी पाऊस, गारपीठ, पावसाचे कमी झालेले प्रमाण याचा विपरीत परिणाम जिवसृष्टीवर होत आहे. याला कारणीभूत माणूस स्वतःचे भविष्यचं स्वतः होऊन संपवत चालल्याने आता हाताबाहेर गेलेला नैसर्गिक ऱ्हास थांबवायचा तर ३५० वर्षांपूर्वी लिहिलेलं छत्रपती शिवरायांचे आज्ञापत्र हा एकमेव पर्याय उरला आहे. भविष्यातील धोके घालवायचे तर जाणकारण्याने सरकार व वन व पर्यावरण खात्याच्या भरवश्यावर न राहता आता थेट नैसर्गिक संसाधने वाचवा, त्यांचे संगोपन व संरक्षण होणे आवश्यकचं आहे, त्यासाठी पुढे या असे अनुभवपूर्ण विचार दुर्ग व जलअभ्यासक राम खुर्दळ यांनी जुने सिडको येथील “पर्यावरण व्याख्यानमालेत “मांडले.

नाशिकच्या जुने सिडको येथील बडदे नगर अर्जुन प्रभात व श्री गुरुजी शाखेच्या वतीने येथे पर्यावरण विषयावर अखंडित व्याख्यान माला सुरु आहे. त्या निमित्ताने शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेचे संस्थापक राम खुर्दळ यांचे दि. 4 रोजी ” छत्रपती शिवरायांचे आज्ञापत्र व पर्यावरण” विषयावर अभ्यासपूर्ण, अनुभवं पूर्ण व्याख्यान झाले. यावेळी त्यांनी सांगितले कि, सह्याद्रीतील गडकोट नैसर्गिक संपदेचे मोठे संसाधन आहे, जिथे नद्या नाले पाणी जन्माला येथे, घनदाट झाडी, वन्यजीव प्राणी असलेल्या याच बेलाग गडकोटात राज्यांनी स्वराज्य साकारले, ही संरक्षण स्थळे भविष्यात रयतेने सांभाळावी म्हणून शिवरायांनी स्वतःच्या मुखातून आज्ञापत्र सांगितले. त्यात जिथे उदक (पाणी)असेल तिथं दुर्ग बांधा,तटोतटी पडणारा केर कसपाट त्याची राख करा व त्यातून भाजीपाला करा, गडांच्या वाटेवर कलारग्यांची झाडे वाढवा, गडा वरील झाडे वाढवा, टिकवा, पाणी जपून वापरा, असे कित्येक विचार छत्रपती शिवरायांनी त्यांच्या अज्ञापत्र प्रकरणात सांगितले आहे, मात्र अनेकांचे त्याकडे दुर्लक्ष आहे.  केवळ हे अज्ञापत्र फलकावर लावून होणार नाही त्याचे अनुसरण होईल कधी? असा सवाल व्यक्त केला. जलदुर्ग, भुयीकोट, डोंगरी दुर्गाचे अतोनात नुकसान झाले आहे. त्याप्रमाणेचं नैसर्गिक जंगलात रोजचे वनवे लावणारे मोकार आहेत. कुऱ्हाडीचे घाव उभ्या झाडांवर होत आहेत. नैसर्गिक जंगलात प्लास्टिक टाकणाऱ्या वनवे लावणाऱ्या दारुडे, शिकारी, विकृताना रोखणार कोण? यंत्रणा गाफिल आहेत, याचा विपरीत परिणाम उष्णता वाढीने दिसतोय तरी माणूस गाफिल का? शासन व त्यांच्या वन पर्यावरण, पुरातत्व या यंत्रणा गाफिल का? असा सवाल व्यक्त होत असताना आता आम्ही नैसर्गिक, ऐतिहासिक जल स्रोत वाचवतोय, वृक्षाचे संगोपन संरक्षण करतोय, वनवा विझवायला जीव धोक्यात टाकतोय याला तुम्ही बळ द्या,असे शेवटी सांगितले.

यावेळी ज्येष्ठ लेखक सावळीराम तिदमे, मधुकर पाटील, शाखा कार्यवाह कृष्णराव बेदडे, योगाचार्य जनार्दन माळी ,
मुकुंद पाठक, आर,के,पाटील, बालाजी पिंगळे, प्रकाश वडनेरे, शांताराम पाटील, राजेंद्र चौधरी, सूर्यकांत सोनवणे, अरूण गायकवाड, अनिल देवरे यासह शिवकार्य गडकोटचे राज धनगर, उपाध्यक्ष भूषण औटे उपस्थित होते. यावेळी व्याख्यात्यांचा परिचय प्रस्तावना जेष्ठ साहित्यिक सावळीराम तिदमे यांनी करुन दिला.

हेही वाचा –

Back to top button