नाशिकच्या जागेचा आज निर्णय शक्य : भुजबळ मुंबईत, कोकाटेंचाही दावा | पुढारी

नाशिकच्या जागेचा आज निर्णय शक्य : भुजबळ मुंबईत, कोकाटेंचाही दावा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- महायुतीत नाशिकच्या उमेदवारीचा संघर्ष टोकाला पोहोचला आहे. उमेदवारीसाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाने घेतलेली आक्रमक भूमिका आणि त्यानंतर सिन्नरचे माजी आमदार ॲड. माणिकराव कोकाटे यांनी उमेदवारीवर केलेल्या दाव्यानंतर शुक्रवारी (दि.२६) मंत्री छगन भुजबळ यांनी मुंबई गाठली तर, भाजपनेही हालचाली गतिमान करत नाशिकवर ताबा मिळविण्याचे प्रयत्न तीव्र केले आहेत. शनिवारी (दि.२७) महायुतीकडून नाशिकच्या उमेदवारीचा फैसला होण्याची शक्यता आहे.

नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाने राजाभाऊ वाजे यांची उमेदवारी जाहीर करून आता महिना उलटला तरी महायुतीच्या उमेदवारीचा निर्णय होऊ शकलेला नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिकची जागा शिवसेना शिंदे गटाकडेच राहणार असा दावा केल्यानंतर शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनीदेखील नाशिकची जागा शिवसेनाच लढविणार, असे नमूद करत उद्या मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून उमेदवाराची अधिकृत घोषणा होणार असल्याचे सांगितले आहे. दुसरीकडे छगन भुजबळ यांनी निवडणूक रिंगणातून माघार घेतल्याचे पत्रकार परिषदेत जाहीर केले असले तरी त्यांनीच उमेदवारी करावी यासाठी राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून त्यांची मनधरणी करण्यात येत आहे. अशातच भुजबळ यांनी शुक्रवारी मुंबई गाठली. त्यातच भुजबळ यांचे निकटवर्तीय दिलीप खैरे यांच्यासाठी त्यांचे बंधू अंबादास खैरे यांनी उमेदवारी अर्ज घेतला. त्यामुळे अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. आता राष्ट्रवादीकडून सिन्नरचे आमदार ॲड. कोकाटे यांचेही नाव उमेदवारीसाठी पुढे आले आहे. राष्ट्रवादीच्या बैठकीतच कोकाटे यांनी निवडणूक लढविण्याची मनीषा बोलून दाखविली आहे. त्यामुळे उमेदवारीची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याकडे नाशिककरांचे लक्ष लागले आहे.

गोडसे कुटुंबीयांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

नाशिकमधून शिंदे गटाकडून इच्छुक असलेले खासदार हेमंत गोडसे यांनी उमेदवारीसाठी अनेकवेळा मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर त्यांचे पुत्र अजिंक्य व स्नुषा भक्ती गोडसे यांनीदेखील शुक्रवारी (दि.२६) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत गोडसेंनाच उमेदवारी मिळावी, अशी गळ घातली. गेल्या दोन पंचवार्षिकमध्ये हेमंत गोडसे यांनी खूप विकासकामे केली आहेत. त्यामुळे आमच्यावर पुन्हा विश्वास टाका, हेमंत गोडसे यांना उमेदवारी द्या, अशी गळ भक्ती गोडसे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना घातली आहे.

मोदी-योगींची १० मे रोजी सभा

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारसभांचा धुरळा आता सुरू होणार आहे. येत्या १० मे रोजी पिंपळगाव बसवंत येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी व उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची जाहीर सभा होणार असल्याचे भाजपतील सूत्रांनी सांगितले. नाशिक, दिंडोरी व धुळे या तीन मतदारसंघांतील उमेदवारांसाठी ही सभा होणार आहे. या सभेच्या माध्यमातून कांदा उत्पादक शेतकऱ्यांची नाराजी मोदी कशी दूर करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा –

Back to top button