Nashik Leopard News : वासराला वाचविण्यासाठी सरसावले, जनावरांची एकी पाहून बिबट्याने ठोकली धूम | पुढारी

Nashik Leopard News : वासराला वाचविण्यासाठी सरसावले, जनावरांची एकी पाहून बिबट्याने ठोकली धूम

घोटी(जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा–  बिबट्या म्हटलं की भल्याभल्यांना घाम फुटतो, पण बिबट्यावरच पळून जाण्याची वेळ जनावरांनी दाखवलेल्या एकीमुळे आली. नाशिकच्या घोटी येथील दौंडत परिसरात ही घटना घडली.  दौंडत परिसरामध्ये बिबट्याचा संचार वाढल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. बिबट्यांमुळे पशुधन संकटात आले असून त्वरित परिसरामध्ये पिंजरा लावण्यात यावा अशी मागणी दौंडस ग्रामपंचायतीने केली आहे.

काही दिवसांपूर्वी वाघदरा शिवारात एका शेतकऱ्याच्या कुत्र्याला बिबट्याने उचलून नेले असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. तसेच काल मध्यरात्री राईस व भगर मिल असोसिएशनचे अध्यक्ष संजय चोरडिया यांच्या फार्महाउस मध्ये बिबट्या शिरला. फार्म हाऊसच्या रखवालदारानेही हा बिबट्या बघितला तसेच सीसीटीव्ही फुटेज मध्येही तो दिसून आला आहे. वासराची शिकार करण्यासाठी बिबट्या गोठ्यात शिरला. तेवढ्यात गायीने हंबरडा फोडला, वासराच्या बचावासाठी गाय पुढे सरसावली यावेळी इतर जनावरांनीही हंबरडा फोडला व वासराच्या बचावासाठी धावून आले. जनावरांची एकी पाहून बिबट्याने धूमठोकली. यावेळी रखवालदारही तिथे आला होता त्यानेही हा सगळा प्रकार पाहिला. तसेच हा संपूर्ण घटनाक्रम सीसीव्हीतही कैद झाला आहे.

दौंडत परिसरामध्ये बिबट्याचा संचार वाढल्याने तेथे त्वरित पिंजरा लावण्यात यावा अशी मागणी सरपंच पांडुरंग शिंदे यांनी वन विभाग इगतपुरी यांच्याकडे केली आहे.

संजय चोरडिया यांच्या फॉर्म हाऊस मध्ये शुक्रवारी पहाटे ४ च्या सुमारास बिबट्या आल्यानंतर सर्व गायी व बछडे आदी एकत्र येऊन जोरात हंबरडा फोडू लागले. गायीनेही हंबरडा फोडला. गायीचे अवसान पाहून तसेच राखणदारीस असलेल्या माणसाची चाहुल लागताच बिबटया त्या फॉर्म हाऊस मधून पळून गेल्याचे संजय चोरडिया यांनी सांगितले. गोठ्यातील सर्व जनावरांनी वासराला वाचविण्यासाठी जी एकी दाखवली त्याची सर्वत्र चर्चा आहे.

हेही वाचा :

Back to top button