Nashik News : वासरासाठी गायीचा बारा तास हंबरडा, उपस्थितांच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या | पुढारी

Nashik News : वासरासाठी गायीचा बारा तास हंबरडा, उपस्थितांच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या

देवळाली कॅम्प : पुढारी वृत्तसेवा- येथील रहिवाशांना आईची माया काय असते, याचा प्रत्यय गुरुवारी (दि. १४) आला. रात्री विहिरीत पडलेले वासरू सकाळी बाहेर येईपर्यंत तब्बल १२ तास गाय जिवाच्या आकांताने विहिरीभोवती घुटमळत होती. गायीची तळमळ पाहून लष्करातील सेवानिवृत्त जवान व कॅन्टोन्मेंट कर्मचारी यांनी विहिरीत उतरत त्या वासराला सुरक्षित बाहेर काढले. त्याला पाहताच गायीने फोडलेला हंबरडा ऐकून उपस्थितांच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या.

रेस्ट कॅम्प रोडवरील कासार मळ्यालगतच्या मोकळ्या जागेत पडीक विहीर आहे. या विहिरीचा कठडा तुटलेला आहे. त्याचा अंदाज आला नसल्याने वासरू विहिरीत पडले होते. गायीने हंबरडा फोडण्यास सुरुवात केली. त्यामुळे परिसरातील नागरिकही जागे झाले. काहींनी तिकडे धाव घेतली. परंतु, विहीर खोल आणि तिथे विजेची सोय नसल्याने बचावकार्य करणे शक्य होत नव्हते. सकाळी या ठिकाणी महिलांची मोठी गर्दी झाली होती. हे दृष्य लष्कराचे सेवानिवृत्त हवालदार किरण सनेर यांनी पाहिले. त्यांनी तातडीने कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या अग्निशमन दलाला माहिती दिली. त्यानुसार शिवराज चव्हाण, जयदीप निसाळ, निखिल भिसे, मंगेश गोडसे, संजय गिते, अशोक गायकवाड यांच्यासह 10 कर्मचाऱ्यांचे पथक अग्निशमन वाहनासमवेत दाखल झाले. विहिरीतील पाण्याचा अंदाज घेत लोखंडी बाज तयार करून ती खाली सोडण्याचे ठरले. मात्र त्यावर वासरू कसे घ्यायचे, हा प्रश्न निर्माण झाला. तेव्हा लष्करी जवान सनेर व कॅन्टोन्मेंट कर्मचारी राजू शिरसाठ हे खाली उतरले. त्यांनी वासराच्या पोटाला व अंगाला दोर बांधला. वरील नागरिकांनी त्यास वर खेचून घेतले. वासराला बघताच त्याच्या आईने फोडलेला हंबरडा अनेकांच्या काळजाला भिडला. सकाळी 8 ते 10 अशी दोन तास ही मोहीम सुरू होती.

पाइपचा आधार ठरला जीवनदायी

विहिरीत मोठ्या प्रमाणावर पाणी होते. वासरू काहीकाळ पोहोत होते. मात्र त्याची दमछाक होत होती. तेव्हा विहिरीतील पाइप या वासरासाठी जीवनदायी ठरला. वासरू त्या पाइपवर आपले डोके ठेवून काही तास शांत होते. हा आधार मिळाला नसता, तर वासरू बुडाले असते.

हेही वाचा :

Back to top button