Dhule Crime : धुळ्यात युवकाकडून दोन देशी बनावटीचे गावठी कट्टे जप्त | पुढारी

Dhule Crime : धुळ्यात युवकाकडून दोन देशी बनावटीचे गावठी कट्टे जप्त

धुळे : पुढारी वृत्तसेवा- शहरात दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने देशी गावठी कट्टे बाळगणाऱ्या युवकाला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या पथकाने गजाआड केले आहे. या तरुणाकडून दोन गावठी कट्टे तसेच दोन जिवंत काडतुस जप्त करण्यात आले आहेत.

धुळे शहरालगत असणाऱ्या पारोळा रोड चौफुली जवळील श्री हनुमान मंदिराच्या परिसरात एक युवक गावठी पिस्तूल बाळगत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी ही माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या निदर्शनास आणून दिली. यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळासाहेब सूर्यवंशी, उपनिरीक्षक कैलास दामोदर, संजय पाटील, सुरेश भालेराव, प्रशांत चौधरी, रविकिरण राठोड, निलेश पोतदार, गुणवंत पाटील, सुशील शेंडे, हर्षल चौधरी या कर्मचाऱ्यांना घेऊन हनुमान मंदिर परिसराजवळ सापळा लावला.

यावेळी एम. एच. 18 सीबी 44 29 या दुचाकीने संबंधित युवक चहाच्या टपरीजवळ आला. या युवकाला ताब्यात घेऊन त्याची विचारपूस केली असता त्याचे नाव शंकर बालकिसन रेड्डी असल्याचे निदर्शनास आले. त्याची अंग झडती घेतली असता त्याच्याकडून 80 हजार रुपये किमतीचे दोन देशी गावठी कट्टे आढळून आले. तसेच दोन जिवंत काडतूस देखील आढळून आल्या. त्यामुळे सुमारे एक लाख 32 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या संदर्भात आझाद नगर पोलीस ठाण्यात भादंवी कलम 188 व भारतीय शस्त्र अधिनियम 1959 चे कलम 3/25 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या युवकाच्या विरोधात गुन्हे दाखल आहे किंवा कसे याची माहिती पोलीस तपासून पाहत आहेत.

हेही वाचा :

Back to top button