नाशिक : मुंबई महामार्गावर घोटीजवळ कारसह मद्यसाठा जप्त | पुढारी

नाशिक : मुंबई महामार्गावर घोटीजवळ कारसह मद्यसाठा जप्त

नाशिक (घोटी) पुढारी वृत्तसेवा
मुंबई आग्रा महामार्गावर मुंबईहुन गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या एका खाजगी चारचाकी वाहनामध्ये बेकायदा विदेशी मद्याच्या लाखो रुपयांच्या बाटल्यांचा साठा मिळून आला. घोटी पोलिसांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली असून यामध्ये दीड लाखाची बेकायदा विदेशी मद्य व चारचाकी असा एकूण तेरा लाखाचा मुद्देमाल घोटी पोलिसांनी जप्त केला आहे. या कारवाईत वाहनचालकाला अटक करण्यात आली आहे.
शनिवार (दि.१७) रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास गुप्त माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली घोटी पोलिसांच्या पथकाने घोटी महामार्गावर टोल नाक्याच्या पुढे काही अंतरावर संशयित वाहनाची झाडाझडती घेतली. यामध्ये चारचाकी (वाहन क्रमांक जीजे – ०५/आरडब्ल्यू – ०२५४) या महिद्र कंपनीच्या मराझो वाहनामध्ये बेकायदेशीरपणे मद्य वाहतूक होत असल्याचे आढळले. यामध्ये विविध कंपन्यांच्या विदेशी मद्याच्या बाटल्यांचा साठा मिळून आला. मद्याची चोरटी वाहतूक करण्यासाठी महागड्या  वाहनामध्ये स्वतंत्र कप्पे तयार करण्यात आल्याचेही आढळले.
हे चारचाकी वाहन मुंबईहून नाशिकमार्गे सुरत गुजरातला जात होते. या कारवाईत पोलिसांनी दीड लाखाचा बेकायदेशीर मद्य साठा व बारा लाख रुपये किंमतीचे वाहन असा साडेतेरा लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार सतीश चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वाहनचालक किरीट हरीलाल बारैय्या (५३, रा सुरत,गुजरात) यास अटक करून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अनिल धुमसे, हवालदार राऊत, गोतुरने, लक्ष्मण धाकाटे, दराडे, सतीश चव्हाण, ढुबे आदींच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली. या कारवाईमुळे महामार्गावरील अवैध व बेकायदेशीर वस्तूंची वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

Back to top button