Shiv Jayanti Celebration Nashik : शहरात दोन हजार कर्मचाऱ्यांचा फौजफाटा तैनात, शिवजयंतीनिमित्त पोलिस प्रशासन अलर्ट | पुढारी

Shiv Jayanti Celebration Nashik : शहरात दोन हजार कर्मचाऱ्यांचा फौजफाटा तैनात, शिवजयंतीनिमित्त पोलिस प्रशासन अलर्ट

नाशिक : पुढारी वृत्तसेवाछत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त शहरात जयंती उत्सव व मिरवणुकांचे आयोजन करण्यात आले आहे. भद्रकाली येथील मुख्य मिरवणूक सोहळ्यासह नाशिक रोड, पंचवटी, पाथर्डी फाटा येथेही मिरवणुका निघणार आहेत. तसेच शहरातील तेरा पोलिस ठाण्यांच्या हद्दीत ठिकठिकाणी उत्सव साजरा होणार असल्याने शहर पोलिसांनी बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. त्यात सुमारे दोनशे अधिकारी व २ हजार कर्मचाऱ्यांचा फौजफाटा बंदोबस्तात तैनात राहणार आहे.

शिवजयंतीनिमित्त शहर पोलिसांनी बंदोबस्ताचे व वाहतूक मार्गाचे नियोजन केले आहे. पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातून निघणाऱ्या मिरवणूक मार्गांवरील वाहतूक मार्गात बदल केले आहेत. तसेच शांतता समितीच्या बैठका घेत सार्वजनिक मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना आवश्यक मार्गदर्शन व सूचना पोलिसांनी दिल्या. त्याचप्रमाणे शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिस ठाणेनिहाय बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. कर्णिक यांच्या आदेशानुसार, उपायुक्त किरणकुमार चव्हाण, मोनिका राऊत, चंद्रकांत खांडवी, प्रशांत बच्छाव यांनी बंदोबस्त तैनात केला आहे. पोलिस आयुक्तांसह चार उपायुक्त, सात सहायक आयुक्तसह ‘स्ट्रायकिंग फोर्स’ नेमण्यात आले आहे. रविवारी दुपारी तैनात केलेला बंदोबस्त सोमवारी मध्यरात्री दीडपर्यंत कायम राहणार आहे.

बंदोबस्तातील मनुष्यबळ

पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली, चार पोलिस उपआयुक्त, सात सहायक आयुक्त, ४६ पोलिस निरीक्षक, १४५ सहायक व उपनिरीक्षक, १ हजार ३३४ अंमलदार, ७०० होमगार्डचे जवान असा फौजफाटा तैनात आहे. तसेच क्यूआरटी, एसआरपीएफच्या दोन तुकड्या व ९ स्ट्रायकिंग फोर्स आहेत.

पायी गस्तासोबत सीसीटीव्हीची राहणार नजर

बंदोबस्ताचा भाग म्हणून पोलिस साध्या वेशात पायी गस्तही घालणार आहेत. तसेच मिरवणूक मार्गांवर सीसीटीव्ही असून, त्यामार्फतही नजर राहणार आहे. तसेच सोमवारी (दि. १९) सकाळी ६ ते रात्री १२ पर्यंत वाद्य वाजविण्याची परवानगी असून, डीजेला बंदी आहे, तर मर्यादित आवाजात साउंड सिस्टीमला परवानगी देण्यात आली. 

हेही वाचा :

Back to top button