‘त्‍याचा खेळ पाहिला की, सचिन तेंडुलकरची आठवण येते’ : रवी शास्‍त्रींनी केले ‘या’ फलंदाजाचे कौतूक | पुढारी

'त्‍याचा खेळ पाहिला की, सचिन तेंडुलकरची आठवण येते' : रवी शास्‍त्रींनी केले 'या' फलंदाजाचे कौतूक

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : भारताने इंग्‍लंड विरुद्धच्‍या कसोटी मालिकेतील तिसर्‍या सामन्‍यात मोठा विजय नोंदवला. या सामन्‍यात युवा फलंदाजांनी लक्षवेधी कामगिरी केली. या कसोटी सामन्‍यात द्विशतक झळकवत यशस्‍वी जैस्‍वाल याने सर्वांचे लक्ष आपल्‍याकडे वेधले आहे. टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी यशस्वीचे राजकोट येथील तिसऱ्या कसोटीतील चमकदार कामगिरीबद्दल कौतुक केले आहे.

राजकोट कसोटीमध्‍ये यशस्‍वी जैस्‍वाल याने दुसऱ्या डावात १०४ धावांची खेळी केली. यानंतर तो रिटायर्ड हर्ट झाला. मात्र, चौथ्या दिवशी तो मैदानात परतला आणि त्याने झटपट द्विशतक झळकावले. २१४ धावांवर तो नाबाद राहिला. यशस्वीच्या या खेळीवर रवी शास्त्री यांनी त्याच्या कौशल्याची तुलना महान क्रिकेटर सचिन तेंडुलकरशी केली आहे.

यशस्वीचा खेळ पाहून मला तरुण सचिन तेंडुलकरची आठवण झाली

रवि शास्‍त्री म्‍हणाले की, “यशस्वी जैस्वालच्‍या फलंदाजीने मी प्रभावित झालो आहे. मैदानावरील त्याची कामगिरी आणि वागणूकही उत्कृष्ट होती. भविष्‍यात तो रोहितच्या अर्धवेळ गोलंदाजी पर्यायांपैकी एक असू शकतो. त्याला गोलंदाजीही दिली जाऊ शकते. यशस्वीचा खेळ पाहून मला तरुण सचिन तेंडुलकरची आठवण झाली. तो मैदानावर सतत व्यस्त असतो. अशक्य काहीच नाही.’ हा फक्त एक शब्द आहे, परंतु तुम्ही त्यांना गुंतलेले पाहत राहाल.”

राजकोट येथे झालेल्‍या तिसऱ्या कसोटीत यशस्वीच्या  214* णि सर्फराज खानच्या नाबाद 68 धावांमुळे भारताने आपला दुसरा डाव 430 धावांवर घोषित केला हाेता. इंग्लंडसमोर 557 धावांचे लक्ष्य ठेवले होते. 557 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडचा दुसरा डाव 122 धावांवर  आटाेपला.

धावांच्या बाबतीत भारताचा सर्वात मोठा विजय

धावांच्या बाबतीत भारताचा राजकाेट कसाेटीतील विजय हा सर्वात मोठा विजय ठरला आहे. यापूर्वी 2021 मध्ये भारताने मुंबईतील वानखेडे येथे न्यूझीलंडचा 372 धावांनी पराभव केला होता. तसेच एकूणच हा कोणत्याही संघाचा कसोटीतील धावांच्या फरकाने आठवा सर्वात मोठा विजय आहे. या बाबतीत कसोटीतील सर्वात मोठ्या विजयाचा विक्रम इंग्लंडच्या नावावर आहे. त्यांनी 1928 मध्ये ब्रिस्बेनमध्ये ऑस्ट्रेलियाचा 675 धावांनी पराभव केला. इंग्लंडचा कसोटीतील धावांच्या फरकाने हा दुसरा सर्वात मोठा पराभव आहे. 1934 मध्ये ओव्हलवर इंग्लंडचा ऑस्ट्रेलियाकडून 562 धावांनी पराभव झाला होता.

भारताने मालिकेत घेतली 2-1 अशी आघाडी

मार्क वुड वगळता इंग्लंडच्या एकाही फलंदाजाला दुसर्‍या डावात 20 चा आकडाही गाठता आला नाही. वुडने 15 चेंडूत 33 धावा केल्या. त्याचवेळी भारताकडून रवींद्र जडेजाने पाच विकेट घेतल्या. याशिवाय कुलदीपला दोन बळी मिळाले. बुमराह आणि अश्विनला प्रत्येकी एक विकेट मिळाली. पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताने 2-1 अशी आघाडी घेतली आहे. हैदराबादमधील पहिली कसोटी इंग्लंडने जिंकली, तर विशाखापट्टणममधील दुसरी कसोटी भारताने जिंकली. यशस्वी जैस्वालने भारताच्या दुसऱ्या डावात 12 षटकारांसह 214 धावा केल्या. रोहित शर्मा आणि रवींद्र जडेजानेही शतके झळकावली. सरफराजने पदार्पणाच्या कसोटीच्या दोन्ही डावात अर्धशतके झळकावली. पहिल्या डावात 62 आणि दुसऱ्या डावात 68 धावा केल्या. चौथा कसोटी सामना 23 फेब्रुवारीपासून रांची येथे खेळवला जाणार आहे.

हेही वाचा : 

 

 

Back to top button