Jalgaon Murder News | अकस्मात मृत्यू नाही तर प्रत्यक्षात खून झाल्याचे निष्पन्न | पुढारी

Jalgaon Murder News | अकस्मात मृत्यू नाही तर प्रत्यक्षात खून झाल्याचे निष्पन्न

जळगाव : पुढारी वृत्तसेवा

भुसावळ तालुक्यातील कुऱ्हा पानाचे या ठिकाणी शेतीवर देखरेखीचे काम करण्याऱ्या व्यक्तीचा दि.14 रोजी शेतातील खळ्यात मृतदेह आढळून आला. शवविच्छेदन झाल्यावर मात्र त्याचा खून झाल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपीला तालुका पोलिसांनी 24 तासात अटक केली आहे.

याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भुसावळ तालुक्यातील कुऱ्हे पानाचे या ठिकाणी सदाशिव राजाराम डहाके (राहणार फिशर तालुका कन्नड जिल्हा संभाजीनगर हल्ली मुक्काम कुऱ्हा पानाचे) या ठिकाणी अण्णा शिंदे यांच्या शेतात देखरेखीचे काम करीत होता. त्याच्या गावातील खळ्यामध्ये त्याचे वास्तव्य होते. बुधवार, दि. 14 रोजी सायंकाळी दीपक पाटील हे सात वाजेच्या सुमारास अण्णा शिंदे यांच्या खळ्यामध्ये दूध काढण्यासाठी गेले असता सदाशिव डहाके पलंगावर झोपलेला दिसला. त्याला आवाज देऊनही तो उठला नाही. संशय आल्याने दीपक पाटील यांनी पोलीस ठाण्यात याबाबत कळवले असता तपासाअंती अकस्मात मृत्यूची नोंद तालुका पोलिसात करण्यात आली. सदाशिव डहाके यांचे अकस्मात निधन झाल्यावर त्यांना विविध ठिकाणी अंतर्गत जखमा असल्याचे वैद्यकीय अधिकारी यांनी शवविच्छेदन अहवाल दिला. मयताचा मृत्यू मारहाणीमुळे झाल्याची गुप्त माहिती पोलीसांना मिळाली आहे.

मयत सदाशिव डहाके व संशयित आरोपी लक्ष्मण गणेश शिराळे (राहणार शेलवड तालुका बोदवड) यांच्यात काही दिवसांपूर्वी जुन्या भांडणाच्या कारणावरून वाद झाला होता. मयत सदाशिव डहाळे याला सिंधी ते मोंढाळे रोडवर जितेंद्र चौधरी यांच्या शेतासमोरच्या रोडवर शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी छातीवर व हातावर मारहाण केली होती. आरोपी पळून जात असल्याची माहिती मिळाल्यावर डी वाय एस पी कृष्णांत पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बबन जगताप, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल पवार, पूजा अंधारे, विठ्ठल फुसे, संजय तायडे, विनोद शेख, प्रमोद सपकाळे, दीपक जाधव, वाल्मीक सोनवणे, आत्माराम भालेराव, रियाजोद्दीन काझी, कैलास विस्कर, जितेंद्र साळुंखे, उमेश बारी, रशीद तडवी यांच्या पथकाने आरोपीला ताब्यात घेतले. याप्रकरणी अनिल धनगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Back to top button