Police Transfer : बदलीविरोधात डॉ. बी. जी. शेखर पाटील यांची ‘कॅट’मध्ये धाव | पुढारी

Police Transfer : बदलीविरोधात डॉ. बी. जी. शेखर पाटील यांची 'कॅट'मध्ये धाव

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- नाशिक परिक्षेत्राचे तत्कालीन विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर-पाटील यांनी नुकत्याच झालेल्या बदलीमुळे केंद्रीय प्रशासनिक न्यायाधिकरणात (कॅट) धाव घेतली आहे. सेवानिवृत्तीस चार महिने बाकी असताना तसेच कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच गृह विभागाने बदली केल्याने त्यांनी ही याचिका दाखल केल्याचे समजते. (Police Transfer)

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गृह विभागाने राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. त्यानुसार डॉ. शेखर पाटील यांची बदली करीत त्यांच्या जागी ठाणे शहराचे तत्कालीन सहआयुक्त दत्तात्रय कराळे यांची नियुक्ती करण्यात आली. तर डॉ. पाटील यांची पुणे मोटार परिवहन विभागात नियुक्ती करण्यात आली. परंतु, या बदलीविरोधात डॉ. पाटील यांनी ‘कॅट’मध्ये याचिका दाखल केली आहे.

एप्रिल २०२२ मध्ये डॉ. पाटील यांची नाशिक परिक्षेत्रात बदली झाली होती. त्याच वर्षी त्यांच्या बदलीचे आदेश आले होते, मात्र ते स्थगित करण्यात आले. त्यानंतर जानेवारी २०२४मध्ये डॉ. पाटील यांची बदली करण्यात आली आहे. मात्र दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच तसेच मे अखेरीस सेवानिवृत्ती असतानादेखील बदलीचे आदेश निर्गमित केल्याचा दावा डॉ. पाटील यांनी याचिकेत केल्याचे समजते.

यावर सोमवारी (दि. ५) ‘कॅट’मध्ये सुनावणी झाली. तसेच १२ फेब्रुवारीपर्यंत या याचिकेवरील अंतिम निकाल येण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, नाशिक परिक्षेत्राची सूत्रे नवनियुक्त विशेष महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी तीन दिवसांपूर्वीच हाती घेतली आहेत. त्यामुळे निकालाकडे पोलिसांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा :

Back to top button