Dhule News : मराठा समाजाने परिवर्तनवादी विचार अंगीकारावे :  गंगाधर बनबरे | पुढारी

Dhule News : मराठा समाजाने परिवर्तनवादी विचार अंगीकारावे :  गंगाधर बनबरे

धुळे : पुढारी वृत्तसेवा- मराठा समाजाने अनिष्ट रूढी परंपरा नष्ट करण्यासाठी परिवर्तनवादी विचार अंगीकारला पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत गंगाधर बनबरे यांनी धुळ्यात व्यक्त केले. या वधू वर परिचय मेळाव्यात अनिष्ट रूढी परंपरा संपवण्यासाठीचे ठराव करण्यात आले. यात प्रामुख्याने प्री-वेडिंग शूटिंगला विरोध करण्यात आला.

मराठा सेवा संघ प्रणित वधु वर सुचक व सामुदायिक विवाह कक्षाच्या वतीने आयोजित वधुवर पालक परिचय मेळावा घेण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा बँकेचे चेअरमन राजवर्धन कदमबांडे हे होते. माजी केंद्रीय मंत्री विजय नवल पाटील यांच्या हस्ते वडाच्या वृक्षाला पाणी टाकून कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. या वेळी प्रा. रवींद्र निकम, मधुकर पाटील, डॉ. राहुल बच्छाव, डॉ. योगेश ठाकरे, डॉ. चेतन पाटील, डॉ अमोल पवार, डॉ सुशिल महाजन, सी एन देसले, उपजिल्हाधिकारी संदीप पाटील, शशिकांत भदाणे, साहेबराव देसाई, सुरेंद्र मराठे, अतुल पाटील, सुनील पाटील, अतुल सोनवणे उपस्थित होते. महाराष्ट्रातील प्रख्यात वक्ते गंगाधर बनबरे यांचे “वधू-वर पालकाची भूमिका” या विषयावरील व्याख्यान झाले. ते म्हणाले की , परिवर्तन स्वीकारा. दिवसेंदिवस घटस्फोटाचे प्रमाण वाढत आहे त्याची कारणे शोधा, मराठा समाजाने कुप्रथांचा त्याग करावा. मराठा समाजामध्ये तोरण आणि मरण ही नवी समस्या निर्माण झालेली आहे. छत्रपती शिवराय, राजमाता जिजाऊ, महाराज सयाजीराव गायकवाड, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श घेऊन समाजाने वर्तमानानुसार स्वतः बदल केला पाहिजे. त्याशिवाय समाजाचे अस्तित्व राहणार नाही. विवाहातील अनिष्ट प्रथा संपवल्या पाहिजेत. वैदिक पद्धतीने दोन-दोन विवाह करणे मराठा समाजाने थांबवले पाहिजे. आपल्या स्त्रियांचा व पूर्वजांचा हा अपमान आहे. मराठा समाजात मुलींची संख्या कमी आहे व त्या जास्त शिकल्या आहेत. त्यामुळे मुलांचे लग्न होणे अवघड झाले. त्यासाठी तरुणांनी उद्योग व्यवसाय व नव्या संधी शोधण्याची गरज आहे. जास्त शिकलेली मुलगी व कमी शिकलेला होतकरू निर्व्यसनी मुलगा असे विवाह करण्याबद्दल समाजाने विचार करावा. राजमाता जिजाऊ मासाहेबांनी नातेसंबंध करताना आपल्यापेक्षा कमी श्रीमंत लोकांच्या मुली केल्या, आपल्या घरातील मुली आपल्यापेक्षा कमी श्रीमंत मुलांना देऊन त्यांना बरोबरीचे स्थान मिळवून दिले. समाजातील नवश्रीमंत व उच्चशिक्षित समाज बांधवांनी यातून बोध घेऊन नवा कृतीशील आदर्श समाजासमोर ठेवावा. मुलीच्या संसारामध्ये मुलीच्या आईचा आवश्यकतेपेक्षा जास्त सहभाग हा घटस्फोटाला कारणीभूत ठरत आहे. मराठा समाजामध्ये घटस्फोटाचे प्रमाण वाढले आहे. एकत्रित कुटुंब पद्धती नष्ट झाल्यामुळे त्याचे वाईट परिणाम घडत आहेत. सामाजिक व कौटुंबिक दडपण मुला-मुलीवर राहिलेले नाही. संस्काराचा अभाव असून महापुरुषांचे विचार माहीत नाहीत. त्यामुळे शिकलेली मुलं मुली सुद्धा आपल्या इतिहास संस्कृतीपासून दूर जात आहेत. विधवा महिलांचा सन्मान व विधवांचे पुनर्विवाह याला आज प्राधान्य देण्याची गरज आहे. लग्नात होणारा अनावश्यक खर्च, कुंडली मुहूर्त, मंगळ यासारखे थोतांड नाकारल्याशिवाय मराठा समाजाची प्रगती नाही. मराठा समाजातील सामाजिक, राजकीय, औद्योगिक क्षेत्रातील श्रीमंत व नामवंत लोकांनी आपल्या मुला-मुलींचे विवाह अत्यंत साध्या पद्धतीने कुंडली, पत्रिका नाकारून करावेत. त्यांचा आदर्श इतर गरीब मराठा समाज घेईल असे आवाहन गंगाधर बनबरे यांनी केले.

प्रथेत सुधारणेचे ठराव मंजूर

प्रिवेडींग शुटिंग बंद करणे, वैदिक -पारंपरिक या दोन तीन पध्दतीने विवाह लावण्याची सुरू झालेली प्रथा बंद करणे, मेहेंदी संगीत हळद या पध्दतीने तिन चार दिवस चालणारे खर्चिक विवाह पद्धती बंद करणे, आहेर देणे घेणे मुळ लावणे पत्रिका प्रत्यक्ष वाटप हे बंद करणे, समाज स्वास्थ्यासाठी प्रदूषण बंदीच्या नियमांचे पालन करणेसाठी कर्णकर्कश डी जे व फटाके आतिषबाजी बंद करणे, अन्नाची नासाडी थांबविणे. साठी अक्षता म्हणून तांदूळ ऐवजी फुले पाकळ्या किंवा टाळी वाजवणे, लग्नात मोजके पदार्थ जेवणात ठेवणे, लग्नसमारंभात अवाढव्य अनाठाई खर्च कमी करणे, वाढलेले घटस्फोटाचे प्रमाण कमी करण्यासाठी सेवा संघाच्या समुपदेशन कक्षाचे मार्गदर्शन घ्यावे असे ठराव वधू वर कक्षाच्या वतीने सर्वांच्या साक्षीने उपस्थित सर्वांनी हात उंचावून एकमताने मंजूर केले. प्रा. बी ए पाटील, एच. ओ पाटील, उमेश शिंदे यांनी वाचन केले.

जिल्हाध्यक्ष संदीप पाटील व एस . एम.पाटील यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी राजेंद्र मोरे, विजयकुमार ढोबळे, नितीन पाटील, प्रविण पाटील, छाजेंद सोनवणे, अविनाश पवार, दिवाण पाटील, गुलाबराव देवरे, संजय पाटील, मनोज पाटील, अनिल अहिरे, बी एम भामरे, ए बी मराठे, लहु पाटील, नरेंद्र पाटील, देवेंद्र गांगुर्डे, डी टी पाटील, नुतनताई पाटील, वसुमतीताई पाटील, सीमाताई वाघ, मनिषाताई पवार, ज्योतीताई पाटील, ॲड तरुणा पाटील, पुजाताई भामरे, सुलभाताई कुवर, शुभांगीताई निकम यांनी मेहनत घेतली,. प्रा डॉ. सुनील पवार, बी ए पाटील, एस डी बाविस्कर, पुनमताई बेडसे यांनी सूत्रसंचालन केले. वधुवर कक्षाचे जिल्हाध्यक्ष पी एन पाटील यांनी आभार मानले.

हेही वाचा :

Back to top button